ठाणे दि.६ :- कोवीड संसर्गाला आळा घालण्यासाठी आपल्या मनातील भिती दूर करत भिवंडी तालुक्यातील कुसापूर, सागाव ग्रामपंचायत हद्दीतील गावातील आदिवासी जनतेने लसीकरणास प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले. या गावातील ३०९ आदिवासी बांधवांनी कोवीड लसींची पहिली मात्रा घेतली.
कोवीड संसर्ग दूर करण्यासाठी सध्या सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातही अगदी दुर्गम भागापर्यंत आरोग्य विभागामार्फत लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, कोवीड लसीसंदर्भात आदिवासी समाजामध्ये अनेक अफवा, गैरसमज पसरले आहेत. त्यामुळे अद्यापही अनेक ठिकाणी आदिवासी समाज लसीकरणापासून दूर होता. मात्र ठाणे आरोग्य विभागाने स्थानिक सरपंच, ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींना सोबत घेत प्रभावी आरोग्य शिक्षण व जनजागृती केली. जिल्ह्यातील कुसापूर, सागाव ग्रामपंचायत क्षेत्रात मोरणी, वापे, दुधनी या गावातील ग्रामस्थांपर्यंत लसीकरणासंदर्भात योग्य माहिती पोचवली आणि विशेष लसीकरण मोहिम राबविली. या विशेष मोहिमेस ग्रामस्थांबरोबरच आदिवासी समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला, अशी माहिती डॉ. माधव वाघमारे व डॉ. माधव कावळे यांनी दिली.
कुसापूर, दुधनी, वापे, देवचोळे, सागाव, एकसल, मोरनी गावातील ग्रामस्थांना कोविड लस घेण्यासाठी कुदे अथवा दिघाशी येथील प्राथमिक आरोग्य पथकाच्या ठिकाणी जावे लागत असे. त्यामुळे ग्रामस्थांचा प्रतिसाद कमी होता. हे जाणून वर्जेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव वाघमारे व डॉ. माधव कावळे यांनी या भागाचा दौरा करून लसीकरणासंदर्भात नियोजन केले. त्यानुसार, नुकतेच कुसापूर व सागाव येथे कोवीड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण ५२५ जणांनी लस घेतली. त्यामध्ये ३०९ आदिवासी बांधवांचा समावेश आहे. यावेळी लसीकरण सत्रास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या दिपाली पाटील यांनी भेट देऊन आरोग्य विभागाचे कौतूक केले.