ठाणे, दि. ०६ – शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला टेंभी नाक्याचा नवरात्रौत्सव हे तमाम देवीभक्तांच्या श्रद्धेचे स्थान. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या नवरात्रौत्सवाची देवीभक्त वर्षभर आतूरतेने वाट बघत असतात. शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा हा वारसा पुढे सुरू ठेवत यंदा त्याला समाजकारणाची जोड दिलीय. गेले दीड वर्षाहून अधिक काळ सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि त्यामुळे राज्यभरात निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नवरात्रीच्या काळात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या राज्यभरातील ब्लड बँकांमध्ये रक्ताची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. त्यामुळे रुग्णांचीही परवड होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अलिकडेच मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. यालाच अनुसरून एकनाथ शिंदे यांनी यंदा नवरात्रीचे औचित्य साधून महारक्तदान सप्ताह आयोजित करण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत हा रक्तदान सप्ताह होणार आहे, असे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख व ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.