केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची मागणी
भिवंडी , दि. ५ : कल्याण ते माळशेज घाट रस्ता आणि ठाणे-भिवंडी बायपास रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या ६३० किलोमीटरच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि कोनशिला अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नाशिक येथे पार पडले. या कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी श्री. गडकरी यांच्याकडे ही मागणी केली. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भारती पवार, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची उपस्थिती होती.
देशातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या ठाणे-भिवंडी १२ पदरी बायपासला मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्याचे काम रखडले आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. मुंबई व मराठवाड्याला जोडणाऱ्या कल्याण ते माळशेज रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करावी, माळशेज घाटात पारदर्शक (काचेचा) स्कायवॉक हा ड्रीम प्रोजेक्ट साकार करण्यासाठी मान्यता मिळावी, वडपे ते गोंदे (नाशिक) पर्यँत सहा पदरी महामार्ग मंजूर करावा,
माळशेज बोगद्याच्या सुमारे ३ हजार कोटींच्या प्रकल्पाला मान्यता द्यावी, आदी मागण्या केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी केल्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे श्री. गडकरी यांनी आश्वासन दिले.