मुंबई : “बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे, अशा संस्थांच्या दर्शनीभागी ‘माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी’ या संदेशासह आकर्षक आणि अभिमानास्पद ढाल असणारी भित्तीपत्रके लावण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे पोस्टर आपल्या सहकारी गृहरचना संस्थेवर लागणे, ही निश्चितच अभिनंदनीय, अभिमानास्पद बाब ठरणार आहे.

पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी’ या आशयाच्या भितीपत्रकाचे लोकार्पण करण्यात आलं. याप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, आदी मान्यवर उपस्थित होते.

यासंबधी माहिती देताना अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे लसीकरण वेगाने व्हावे, याकरिता सर्वस्तरीय विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जास्तीत जास्त जनजागृती होण्याकरिता ‘माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी’ आणि ”My Society, Responsible Society” असा संदेश असलेली मराठी व इंग्रजी भाषेतील भित्तीपत्रके प्रकाशित करण्यात आली आहेत. ही भित्तीपत्रके महापालिकेच्या सर्व २४ विभागांमधील ज्या सहकारी गृहरचना संस्थांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे, अशा सोसायट्यांच्या दर्शनी भागी लावण्याचे आदेश यापूर्वीच सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.

या भित्तीपत्रकांवर संबंधित सहकारी संस्थेचे नाव नमूद करून त्यावर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची स्वाक्षरी असणे व महापालिकेची मुद्रा (Stamp) असणे बंधनकारक आहे. याच ‘पोस्टर’वर एक ‘क्यू आर कोड’ असून तो आपल्या भ्रमणध्वनीच्या सहाय्याने स्कॅन केल्यावर भ्रमणध्वनीमध्ये https://stopcoronavirus.mcgm.gov.in/vaccination हे संकेतस्थळ उघडले जाणार आहे. या लिंक वर सदर गृहरचना संस्था ज्या परिसरामध्ये आहे, त्या परिसरातील लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध असणार आहे, असेही काकाणी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *