कल्याण : चेतना शाळा ते नेवाळी नाका श्रीमलंग रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला आहे.त्यामुळे कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
चेतना शाळा ते नेवाळी नाका मलंग रस्ता हा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ , बदलापूर आणि ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे अपघात होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे दि.२९ सप्टेंबर २०२१ रोजी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना व कंत्रादाराला घेऊन मी स्वतः प्रत्यक्ष दौरा करुन आढावा घेतला असता रस्त्याच्या दर्जाबाबत व महानगरपालिकेने कंत्राटदाराला दिलेल्या बिलाबाबत धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
रस्त्याचे काम महानगरपालिकेकडून मे.रेल्कॉन इन्फ्राप्रोजेक्टस् प्रा.लि. मुंबई, या कंपनीला जवळपास ४२ कोटी दिले जी कंपनी मुंबईमध्ये ब्लॅकलिस्टेड असल्याची माहिती मिळाली. महापालिकेने या कंपनीला दिनांक १३/०४/२०१७ रोजी काम दिले व १२/०९/२०१८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश होते. या कालावधीत काम पूर्ण झाले नाही.त्यानंतर पुन्हा ३१/०५/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली व मूळ रकमेत जवळपास ४ कोटी रुपये कंत्राटदाराला वाढवून देण्यात आले. यापेक्षा धक्कादायक बाब अशी आहे की, रस्त्याचे काम ७५ टक्केही झाले नाही आणि महानगरपालिकेने कंत्राटदारास ९५ टक्के पेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे.
कल्याण-डोंबिवली मधील गेल्या ८ वर्षात खड्डे भरण्यासाठी ११४ कोटी रुपये खड्डयात घातल्याची चर्चा आहे. इथे तर रस्त्याच्या संपूर्ण निधीवरच डल्ला मारला आहे. त्यामुळे केडीएमसी आयुक्त यांनी स्वतः याबाबत चौकशी करावी आणि या रस्त्याची पाहणी करावी असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
तसेच आमदार यांनी सांगितले की तातडीने याबाबत निर्णय घ्यावा व या रस्त्यावर कार्यादेश दिल्यापासून आतापर्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाला जे-जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन त्यांना निलंबित करावे आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून जी रक्कम महानगरपालिकेकडून घेण्यात आली आहे ती वसूल करावी.