केडीएमसीच्या प्लास्टिक बंदीचे तीनतेरा
हाजी मलंग ते चिंचपाडा रस्त्याला प्लास्टिक बंदीचे वावडे !
कल्याण (प्रविण आंब्रे): कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ‘प्लास्टिकमुक्त कल्याण-डोंबिवली’ अशी लाखमोलाची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात या बंदीचे कधीच तीनतेरा वाजले आहेत. पालिकेतील मुख्य शहरी भागापासून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या हाजी मलंग ते चिंचपाडा या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी कचरा आणि प्लास्टिकचे ढीग दिसत असल्याने या रस्त्याला महापौरांनी घोषित केलेल्या ‘प्लास्टिक बंदी’चे वावडे असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्याने महापौर पदावर स्थापन होणाऱ्या आजपर्यंतच्या सर्वच महापौरांनी शहराचे बकाल रुपडे बदलण्यासाठी वेळोवेळी नाविन्यपूर्ण घोषणा करण्याची प्रथा पाडली. प्रत्यक्षात त्यापैकी किती घोषणा प्रत्यक्षात साकार झाल्या हा भाग अलाहिदा राहिला आहे. विद्यमान महापौरांनी देखील ‘प्लास्टिकमुक्त कल्याण-डोंबिवली’ अशी घोषणा दिली. दि. १४ ऑगस्टपासून हे प्लास्टिकमुक्त शहर अभियान सुरु करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणतेही अभियान राबवताना जसा गाजावाजा करते तसा यावेळीही करताना करण्यात आला.
कमी मायक्रोन जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना बंदी असली तरी कल्याण-डोंबिवली शहरासह अन्य ठिकाणी ही बंदी गाभिर्याने पाळली जात नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी असलेली आवश्यकता गांभीर्याने घेत महापौर देवळेकर यांनी ही घोषणा केली. मात्र बहुसंख्य नागरिक या अभियानाबाबतीत उदासीन आहेत. फळ-भाजी विक्रेते, दुकानदार यांचीही मानसिकता तशीच आहे. प्लास्टिक बंदी असली तरी अजूनही शहरातील सर्व बाजारपेठ भागात नागरिकच अनेकदा प्लास्टिक पिशव्यांची मागणी भाजीवाल्यांकडे करताना दिसतात. तर धंदा करण्यासाठी भाजीवालेही सर्रास मनाई असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. त्यांच्यावर ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने प्लास्टिकमुक्त शहर अभियानाचा स्वच्छता मोहीमेला खीळ बसल्याचे चित्र आहे. असेच चित्र कल्याण पूर्वेतील चिंचपाडा ते हाजी मलंग रस्ता या १०० फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत असून त्यात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसत आहे. मोहोने रस्त्यावर लहुजीनगर वस्तीच्या बाजूला देखील कचरा आणि प्लास्टिकचे ढीग पसरलेले आहे.
शहरात आणल्या जाणाऱ्या बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यासाठी महापालिकेने कठोर दंडात्मक उपाय योजण्याची आवश्यकता आहे. काही उपाययोजना करण्याचे महापालिकेकडून तयारी सुरू आहे. त्याला गती देण्याची आवश्यकता ‘प्लास्टिक बंदी’साठी काम करणारे सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी व्यक्त केली आहे.
——————————————