कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचा वर्धापनदिन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. सावित्रीबाई फुले रंगमंदिरात या सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळातील प्रत्येकाने अनुभवलेले क्षण असो वा त्या विरोधात शासन प्रशासन आणि जनतेचा सुरू असलेला लढा हे नृत्याच्या माध्यामातून रेखाटण्यात आले. पालिकेतील वरिष्ठ अधिका-यांनीही आपल्या समधुर आवाजात गीत सादर केले तर एकपात्री अभिनय सादर करून आपल्या कलागुणांची झलक दाखवली. या कार्यक्रमात कोरोना योध्दांना सन्मानित करण्यात आले.

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजिलेल्या या छोटेखानी समारंभात कोविड कालावधीत महापालिकेला मदत केलेल्या /करणा-या डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टरांचा, आयएमए, निमा, धारपा, केम्पसवा या वैदयकीय संघटनांतील अध्यक्षांचा, बाज आर आर रुग्णालयाचे डॉ. अमिर कुरेशी , निऑन रुग्णालयातील मिलींद शिंदे हॉलिक्रॉस हॉस्पिटलच्या सिस्टर शिबा यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोविड कालावधीत मदत करणा-या विविध एनजीओ, कोविडच्या पहिल्या लाटेत अन्नधान्य पुरवठा करणा-या दानशुर व्यक्ती, गुरुद्वारा, कल्याण पश्चिम, संत गजानन सेवा ट्रस्ट या सारख्या सेवाभावी संस्था कोविड कालावधीत महापालिकेस सातत्याने सहकार्य करणा-या पोलिस अधिकारी/कर्मचारी वर्गाचा, महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमीमध्ये सेवा देणा-या व्यक्तींचाही महापालिका आयुक्त यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कोविड कालावधीत उत्कृष्ठ काम केलेल्या अधिकारी/कर्मचारी वर्गाचा तसेच विविध पत्रकार संघटनांचा देखील प्रतिकात्मक स्वरुपात यावेळी सत्कार करण्यात आला.

बहारदार सांस्कृतीक कार्यक्रम
महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने विशेषत: आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त विनय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी सुमधुर आवाजात गाणी गाऊन तसेच कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांनी आपल्या एकपात्री अभिनयाने कार्यक्रमात रंगत आणली.

टिम वर्क हेच यशाचं गमक : डॉ विजय सुर्यवंशी
टिम वर्क हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक आहे, असे उद्गार महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिरात‍ कोविड नियमांचे पालन करुन काल दुपारच्या सत्रात संपन्न झालेल्या महापालिकेच्या वर्धापन दिन समारोहात महापालिका सचिव संजय जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे उद्गार काढले. या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या कारर्किदीतील वेगवेगळया घडामोडींची माहिती दिलखुलासपणे प्रेक्षकांसमोर मांडली. कोविडच्या लढाईने एक वेगळीच उर्जा सगळयांना दिली, ती वापरुन नागरिकांचे प्रश्न सोडवू या, नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा वचनबध्द होऊ या असे आवाहन त्यांनी अधिकारी वर्गाला केले.

या समारोहास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सपत्नीक उपस्थित होते, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आई-वडील देखील हा सोहळा पाहण्यासाठी समक्ष उपस्थित होते. तसेच महापालिका क्षेत्रातील डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टर्स, एनजीओज, अप्पर पोलिस आयुक्त दत्‍तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त गुंजाळ, महापालिकेचा अधिकारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका सचिव तथा विभागप्रमुख, माहिती व जनसंपर्क संजय जाधव , दत्तात्रय लदवा, महेश देशपांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *