ठाणे दि. २ : स्वच्छतेतूनच गावात समृध्दि येण्यासाठी मी माझे गाव अधिक स्वच्छ , सुंदर ठेवेन , उघड्यावर कुठेही घाण होऊ देणार नाही. सांडपाण्याचे आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन करेन. ओला आणि सुका कचऱ्याचे घरातच विलगीकरण करेन. माझं गाव हागणदारी मुक्त अधिक बनविण्यासाठी सहकार्य करेन. अशी शपथ घेऊन गाव स्वच्छ सुंदर बनविण्याचा निर्धार शनिवारी जिल्ह्यातील विविध गावातल्या गावकऱ्यांनी केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छ ही सेवा अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘महा श्रमदान’ करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आज संबोधित केले. हा स्वच्छता संवादाचा कार्यक्रमही गावकऱ्यांना दाखविण्यात आला.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.यामध्ये जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी मुरबाड तालुक्यातील भुवन गावाला भेट देऊन शाश्वत स्वच्छतेविषयी तसेच जल जीवन मिशन विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी भुवन ग्रामपंचायतीने प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला. त्याचबरोबर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कक्ष अधिकारी स्मिता राणे यांनी कशेळी ग्रामपंचायतीला भेट देऊन गावातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कशा प्रकारे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्हयात देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, श्रमदान, कचरा वर्गीकरण मोहिम, प्लॅस्टीकमुक्तीसाठी प्रयत्न आदी उपक्रम राबवून गावात शाश्वत स्वच्छता टिकावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाकरिता जिल्हा कक्षातील ज्ञानेश्वर चंदे, दत्तात्रय सोळंके, राजेश वाघे ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.