मुंबई, दि. २ :- मराठीतील विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार यांचे आज निधन झाले आहे. मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगत आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची ‘मिरासदारी’ अबाधित राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले. कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला. तसेच ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही गेले. दादासाहेब उभे राहायचे, खर्जातील आवाजात कथा रंगवून सांगू लागले की त्या गावातले नमुने आरसा दाखवल्याप्रमाणे खळखळून हसू लागायचे. विलक्षण निरिक्षण शक्ती आणि लेखन-सादरीकरणातील निर्भेळपणा यामुळे मिरासदार यांनी आपली अशी ‘मिरासदारी’ निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
२४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा
ज्येष्ठ साहित्यीक दत्ताराम मारुती मिरासदार यांनी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं आहे. ते ९४ वर्षाचे होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल, १९२७ मध्ये झाला. मिरासदार यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले होते. पुण्यात आल्यावर ते एम्.ए. झाले. काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.