डोंबिवली :  हातमाग, विणकाम करून तयार केलेल्या कपडयांचे भव्य प्रदर्शन व विक्री डोंबिवलीतील स्वामींचे घर या ठिकाणी सुरू असून या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वामींचे घर टिळकनगर केंद्राच्या संस्थापिका माधवी सरखोत यांच्या हस्ते पार पडले यावेळी भाऊराया हॅन्डलूमचे प्रमुख व प्रदर्शनाचे आयोजक पांडूरंग पोतन यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. 


भाऊराया हॅन्डलूम यांच्यावतीने राज्यभरात हातमाग आणि यंत्रमाग कपडयांचे प्रदर्शन भरवले जाते. डोंबिवलीत गेल्या पाच वर्षापासून हे प्रदर्शन भरवले जात आहे. यंदा हे प्रदर्शन १७ ऑक्टोबरपर्यंत भरविण्यात आले आहे. डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर येथील मानव कल्याण केंद्रांशेजारील स्वामींचे घर याठिकाणी हे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे.  या प्रदर्शनात विविध प्रकारच्या मधुराणी सिल्क आणि सुती साडया, सेमी पैठणी, इरकल, पटोला साडी, ड्रेस मटेरिअल, सोलापुरी चादर, बेडशीट, टॉवर, शर्ट आदी असे विविध प्रकार विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. हातमाग उद्योगांना पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करीत आहे भाऊराया हॅन्डलूम यांच्यावतीने पुढाकार घेऊन राज्यात अनेक ठिकाणी विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले जाते त्यामुळे उद्याेगांना आणि कामगारांना चालना मिळते असे भाऊराया हॅन्डलूम प्रदर्शनचे प्रमुख पांडूरंग पोतन यांनी सांगितले. 

भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी व हातमागाच्या प्रचारासाठी प्रदर्शनाचे आयेाजन केले जाते. हातमाग विणकाम करून तयार केलेले कपडे अत्यंत चांगल्या दर्जाचे असते या कापडाच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारचा त्वचारोग होत नाही मात्र हे कापड तयार करण्यासाठी मनुष्यबळ अधिक लागत असल्याने व विक्री दरापेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्याने सध्या हातमाग कापडाची निर्मिती कमी होत आहे असेही पोतन यांनी सांगितले. खादी तसेच सुती कापडाच्या विक्रीवर २० टक्के सूट ठेवण्यात आली असून नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन पोतन यांनी केले आहे. हे प्रदर्शन १७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *