नवी मुंबई दि.३० : नवी मुंबई आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक टर्मिनस उपलब्ध करून द्यावेत. वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश देतानाच महिलांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, तसेच पोलीस आयुक्तांनी आठवड्यातून एक दिवस भेटीचा वेळ ठरवावा जेणे करून सामान्यांना त्यांच्या तक्रारी मांडता येतील यासाठी नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

बेलापूर येथील सिडको भवनच्या सभागृहात आज उपमुख्यमंत्र्यांनी एमआयडीसी आणि कायदा सुव्यवस्था विषयक समस्या ऐकून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलीकनेर आदी उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था, पोलीस स्थानके, चौक्या, वाहने, पोलिसांची निवास व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे याबाबत आढावा घेतला. यावेळी नागरिकांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या.

जास्त पाऊस पडणा-या ठिकाणी रस्ते काँक्रीटचे करा
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जेथे पाऊस जास्त पडतो तेथे डांबरी रस्त्याऐवजी सिमेंट काँक्रीटचे करावेत. जेणेकरून खड्ड्यांची समस्या जाणवणार नाही. औद्योगिक वसाहतींमध्ये पार्किंग, रस्ते, वृक्ष लागवडीसाठी जागा अशा प्रकारची कामे विशिष्ट मुदतीत पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश देतानाच आश्वाशीत केलेली कामे झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

एमआयडीसी कडून औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या अडचणींवर तातडीने मार्ग काढून औद्योगिक संस्थांशी समन्वयातून उपाययोजना कराव्यात, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *