ठाणे : ठाणे : एकिकडे आरे तील एकाही वृक्षाला धक्का न पोहचवता मेट्रोची चाचणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले असतानाच, दुसरीकडे रस्ता रूंदीकरणासाठी महापालिकेकडून सर्रास वृक्षतोड केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आलाय. त्यामुळे हा विरोधाभास दिसून येत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत असून त्यामुळे ठाण्यातील पर्यावरण कार्यकत्यांनी बेकायदेशीर वृक्षतोड विरोधात ठाणे महापालिकेसह वनविभाग आणि पर्यावरण मंत्रालयाला कायदेशीर नोटीस बजावलीय.
वृक्ष प्राधिकरणाने रस्ता रुंदीकरणात बाधित वृक्षांचे वयोमान व त्यांचे निसर्गसाखळीतील महत्वाचे स्थान याचा विचार ना करता नियमबाह्य पद्धतीने ४३१ वृक्ष तोडण्यास दिलेली मंजुरी हीच मुळात बेकायदेशीर असल्याचा दावा करत ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त , वृक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठामपा वारसा समिती, वन विभाग व पर्यावरण मंत्रालय यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. एक महिन्याच्या आत या नोटिसीला उत्तर दिले नाही अन्यथा बेकायदेशीर वृक्षतोड सुरु केल्यास मुंबई उच्च न्यायालयात या सर्वाना प्रतिवादी बनविण्यात येईल असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आलेले आहे. कोलशेत येथील विकास रस्ता कमीत कमी वृक्षांना क्षती पोहोचेल अशा पद्धतीनेही बनविला जाऊ शकतो. असा पर्याय रोहित जोशी यांनी तज्ज्ञांच्या मदतीने बनविला असून ठाणे महानगरपालिकेने त्याचा अवलंब करावा अशी मागणी केली आहे.
कोलशेत नंदीबाबा चौक ते क्लॅरियंट कंपनी चौक येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित विकास रस्त्यामध्ये बाधित ४३१ वृक्ष वाचविण्यासाठी अलीकडेच सर्वसामान्य ठाणेकरांना रस्त्यावर उतरत संघर्ष करावा लागला होता. ठाणे शहरातील एकमेव असलेला उर्वशी वृक्षाच्या निमित्ताने ठाण्यातील वारसा वृक्षांची होणारी अक्षम्य हेळसांड ठाणेकरांसमोर उघड झाली होती. वृक्ष प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी देताना वारसा वृक्षांची गणना न केल्याने तसेच बाधित वृक्षांवर पावसाळ्यात पक्ष्यांची घरटी व पिले आहेत हे माहित असताना देखील सर्वसामान्यांचा विरोध डावलून ३० पेक्षा जास्त वृक्षांची अवैधरित्या कत्तल केली होती. याची तक्रार १८ जुलै रोजी स्थानिकांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांचेकडे केली होती. या तक्रार अर्जावर सुमारे ५०० पेक्षा जास्त रहिवाश्यांच्या सहया करून वृक्षतोडीस विरोध दर्शविला होता. तसेच वन विभागाच्या उपवन संरक्षकांना येथील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करीत कंत्राटदाराने केलेल्या बेकायदा वृक्षतोडीबाबत अवगत केले होते. महिना उलटूनदेखील नागरिकांच्या या पत्रव्यवहाराला प्रशासकीय यंत्रणेकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही.
आंतरराष्ट्रीय कीर्तिमान प्राप्त ठाणेस्थित वृक्ष तज्ञ सीमा हर्डीकर व हर्षद ऐनापुरे तसेच अनेक वैज्ञानिक अहवाल प्रसिद्ध करणारे प्राणी व पक्षीतज्ज्ञ प्राध्यापिका क्लारा कोरिआ व अविनाश भगत यांनी नागरिकांतर्फे कोलशेत येथील बाधित वृक्षांची पाहणी केली. सुमारे महिनाभर परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून या ठिकाणचा सर्वांगाने अभ्यास केला गेला. स्थानिक वृक्ष, पक्षी, प्राणी, फुलपाखरे, सरीसृप, उभयचर, कीटक या सर्वांचा अहवाल स्वतंत्रपणे बनविला गेला आहे. सदर वैज्ञानिक अभ्यास अहवाल तज्ज्ञांकडून सर्वसामान्य ठाणेकरांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केला असून कोलशेत येथील अमूल्य वृक्षसंपदा व जैवविविधता टिकवून ठेवण्याचे त्यात आवाहन करण्यात आले आहे.
बाधित वृक्षांपैकी अनेक वृक्ष परीससंस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. हे वृक्ष पशु, पक्षी प्राणी यांसाठी अन्न मिळविण्याचे प्रमुख स्रोत असल्याने स्थानिक जैवविविधतेसाठी ते अत्यंत उपयुक्त आहेत. या वृक्षांचा घेर हा ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या निकषानुसार तपासून पाहिल्यास त्यांची नोंद खरेतर वारसा वृक्षांमध्ये व्हायला हवी. परंतु ठामपाने वस्तुस्थितीकडे संपूर्णतः दुर्लक्ष करून याना तोडायची परवानगी दिली आहे. अलीकडेच राज्य शासनाने वारसा वृक्षांच्या संरक्षणासाठी वृक्ष कायद्यामध्ये बदल करीत ५० पेक्षा अधिक वयाच्या कोणत्याही जातीच्या वृक्षांना तोडण्याच्या कारवाईचे अधिकार राज्य वृक्ष प्राधिकरणाला दिले आहेत त्यामुळे असे वृक्ष तोडण्याची प्रकरणे आता महानगरपालिकांना राज्य वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवावी लागतील. :- रोहित जोशी, पर्यावरण कार्यकर्ता