ठाणे : कोलशेत नंदीबाबा चौक ते क्लॅरियंट कंपनी चौक येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित विकास रस्त्यामध्ये बाधित ४३१ वृक्ष वाचविण्यासाठी सर्वसामान्य ठाणेकरांना रस्त्यावर उतरत संघर्ष करावा लागला होता. ठाणे शहरातील एकमेव असलेला उर्वशी वृक्षाच्या निमित्ताने ठाण्यातील वारसा वृक्षांची होणारी अक्षम्य हेळसांड ठाणेकरांसमोर उघड झाली होती. वृक्ष प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी देताना वारसा वृक्षांची मोजदाद न केल्याने तसेच बाधित वृक्षांवर पावसाळ्यात पक्ष्यांची घरटी व पिले आहेत हे माहित असतानादेखील सर्वसामान्यांचा विरोध डावलून ३० पेक्षा जास्त वृक्षांची अवैधरित्या तोड केली होती. याची तक्रार १८ जुलै रोजी स्थानिकांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांचेकडे केली होती तसेच वन विभागाच्या उपवन संरक्षकांना हि अवगत केले होते.

महिना उलटूनदेखील नागरिकांच्या या पत्रव्यवहाराचा अजूनही कोणताही प्रतिसाद यंत्रणांनी दिला नसल्याने आंतरराष्ट्रीय कीर्तिमान प्राप्त ठाणेस्थित वृक्ष तज्ञ् सीमा हर्डीकर व हर्षद ऐनापुरे तसेच अनेक वैज्ञानिक अहवाल प्रसिद्ध करणारे प्राणी व पक्षीतज्ज्ञ प्राध्यापिका क्लारा कोरिआ व अविनाश भगत यांनी नागरिकांतर्फे कोळशेत येथील बाधित वृक्षांची पाहणी केली. सुमारे महिनाभर परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून या ठिकाणचा सर्वांगाने अभ्यास केला गेला. सदर वैज्ञानिक अभ्यास अहवाल तज्ज्ञांकडून सर्वसामान्य ठाणेकरांच्या माहितीसाठी अलीकडेच प्रसिद्ध केला असून कोलशेत येथील अमूल्य वृक्षसंपदा व जैवविविधता टिकवून ठेवण्याचे त्यात आवाहन करण्यात आले आहे.

या २ अहवालातील वृक्षांशी व जैवविविधतेशी निगडित काही ठळक निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत

१) बाधित वृक्षांपैकी आंबा, वड, जांभूळ वृक्ष नैसर्गिक परीससंस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. हे वृक्ष पशु पक्षी प्राणी यांसाठी अन्न मिळविण्याचे प्रमुख स्रोत असल्याने स्थानिक जैवविविधतेसाठी ते अत्यंत उपयुक्त आहेत. या वृक्षांचा घेर हा ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या निकषानुसार तपासून पाहिल्यास त्यांची नोंद खरेतर वारसा वृक्षांमध्ये व्हायला हवी. (परंतु ठामपाने वस्तुस्थितीकडे संपूर्णतः दुर्लक्ष करून याना तोडायची परवानगी दिली आहे. अलीकडेच राज्य शासनाने वारसा वृक्षांच्या संरक्षणासाठी वृक्ष कायद्यामध्ये बदल करीत ५० पेक्षा अधिक वयाच्या कोणत्याही जातीच्या वृक्षांना तोडण्याच्या कारवाईचे अधिकार राज्य वृक्ष प्राधिकरणाला दिले आहेत त्यामुळे असे वृक्ष तोडण्याची प्रकरणे आता महानगरपालिकांना राज्य वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवावी लागतील.)

२) वृक्ष प्राधिकरणाने परवानगी देताना ४६ वृक्षांना “जंगली” असे संबोधिले आहे यावर अहवालात तज्ज्ञांनी तीव्र आक्षेप नोंदविला असून वृक्ष प्राधिकरणाच्या हलगर्जीपणाबद्दल ताशेरे ओढले आहेत. ठामपाच्या तज्ज्ञांना या वृक्षांची ओळख पटविता येत नसल्यास तज्ज्ञांनी स्वतःहून महापालिकेला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. (प्राधिकरणात तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असल्याचा दावा करणाऱ्या ठामपासाठी हि नक्कीच शरमेची बाब आहे)

३) ठामपाला ओळख पटविता न आलेल्या अनेक वृक्षांपैकी एका दुर्मिळ वृक्षाचे नाव “उर्वशी” असून याचे मूळ ब्रह्मदेशात आहे. ब्रह्मदेशातूनसुद्धा याचे उच्चटन झाल्याने हा वृक्ष दुर्मिळ प्रकारात मोडतो. हा ठाण्यातील एकमेव ज्ञात वृक्ष असल्याने त्याला कोणत्याही परिस्थितीत धोका पोहोचवू नये

४) यामधील २ पांढरे रेशीम वृक्ष असून वटवाघळांच्या फळे खाणाऱ्या जातीला आणा पुरविण्याचे प्रमुख स्रोत आहेत.

५) बाधित वृक्षांपैकी एक वड कुळातील खारोटा असून येऊरच्या जंगलात उपलब्ध असणाऱ्या वृक्षांपेक्षाही याचा विस्तार अधिक असल्याने त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

वरील सर्व वृक्षांचे सर्वप्रथम संरक्षण करण्याचाच विचार करावा व त्यासाठी सुयोग्य पर्यायी मार्गांचा विचार करावा व तसे करणे अगदीच अशक्य असल्यासच या वृक्षांचे त्तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने पुनर्रोपणाचा विचार करावा. असेही अहवालात म्हटले आहे

६) ठाणे प्रदेशात दिसणाऱ्या ४७५ पक्ष्यांच्या प्रजातींपैकी १८५ पक्ष्यांच्या प्रजाती कोलशेत परिसरात आढळून येतात, ज्याचे प्रमाण ठाण्यात आढळणाऱ्या एकूण पक्ष्यांच्या ३८.९५ % आहे. पूर्वीपासून येथे असलेल्या कंपन्यांच्या आवारात हि जैवविविधता समृद्ध होत गेली परंतु आता रहिवासी वापरासाठी वृक्षतोड सुरु झाल्याने सर्व प्रजाती येथून लुप्त पावत आहेत हि धोक्याची घंटा आहे.

७) पक्ष्यांच्या 1 प्रजातींपैकी आणि IUCN स्थिती २०२१ नुसार (असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. लाल यादी ज्याला आय.यू.सी.एन. लाल यादी किंवा लाल डेटा यादी (इंग्रजी: IUCN Red List) म्हणतात, (विविध देश आणि संस्था राजकीय व्यवस्थापन एककामध्ये एखादी प्रजात नामशेष होण्याच्या धोक्याचे मूल्यांकन करून प्रादेशिक लाल याद्या तयार करत असतात, हि एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे .)

या प्रजाती खालीलप्रमाणे आहेत –

धोकादायक स्थिती – १ – ०.५४%
असुरक्षित – १ – ०.५४%
धोकादायक स्थिती जवळ – १० – ५.४१%
चिंता न करण्यायोग्य – १७३ – ९३.५१%

८) कोलशेत येथे आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी २२.२० % पक्ष्यांचे संरक्षण केले पाहिजे. त्यातील ४ प्रकारचे पक्षी हे कोलशेत येथे कायम वास्तव्य करून असलेल्या प्रजाती आहेत.

एकूण ५२% पक्षी निवासी आहेत तर ४८% पक्षी स्थलांतरित आहेत. च्या
खालील स्थलांतरित मार्गाचे पक्षी – आफ्रिकन -युरेशियन फ्लायवे आणि आफ्रिका सेंट्रल
एशियन फ्लायवे जो उत्तर आशियाला दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वला जोडतो तो भारताला भेट देतो
आणि यातील ४८% पक्षी कोलशेत परिसराला भेट देतात. कोलशेत येथे आढळणारे २ पक्षी – स्टेप्पीचा गरुड हा लुप्तप्राय होणारा, तर मोट्ठ्या ठिपक्यांचा गरुड याना असुरक्षित स्थितीत मानले जाते.

९) महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल याचा येथे २०१३ सालापासून अधिवास असल्याच्या पुराव्यासहित नोंदी आहेत. हरियाल ने मोठ्या संख्येने येथील झाडांवर घरटी बांधल्याची नोंद आहे. ठाणे शहरासाठी व विशेषतः कोळशेतकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. दुर्दैवाने याचा कोणताही अभ्यास न ठाणे महानगरपालिकेने केला आहे न वन विभागाने. त्यामुळे आज राज्य पक्ष्याच्या अधिवासाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

१०) आफ्रिकेतून स्थलांतर करणाऱ्या अमूर चा ससाणा सारख्या ८३ पक्ष्यांच्या प्रजाती प्रवासामध्ये थांबण्यासाठीचा टप्पा म्हणून कोलशेत येथील झाडांचा काही काळापुरता आश्रय घेतात. त्यांना त्यांच्या आश्रयापासून हिरावून घेणे क्रूरपणाचे ठरेल.

११) सर्वात महत्वाचे म्हणजे निवासी पक्षी पूर्णपणे या झाडांवर अवलंबून आहेत आणि
इतर जैवविविधता हि खाद्य, प्रजनन आणि घरट्यासाठी संपूर्णपणे या वृक्षांवर अवलंबून आहे. जर पर्यावरणीय समतोल राखला गेला तर कोलशेतच्या संपूर्ण वनस्पती आणि प्राणिमात्रांची काळजी घेतली जाईल अन्यथा ते येथून लुप्त होतील

गेल्या काही वर्षात मेट्रो, उड्डाणपूल, गृहनिर्माण व व्यापारी संकुले इत्यादी. इत्यादींच्या बांधकामांमुळे प्राणी, पक्षी, वनस्पती यावर अगोदरच मोठा परिणाम झाला आहे. वैयक्तिक प्रजातींची संख्या चिंतादायक रित्या कमी होत आहे त्यामुले विकासकामनासाठी अन्य पर्यायी उपाय शोधणे आवश्यक आहे. असा एक पर्याय ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी तयार केला असून ठाणे महानगरपालिकेने मागणी केल्यास त्यांना पुढील चर्चेसाठी सुपूर्त करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त फुलपाखरे, सरीसृप, उभयचर, कीटक यांचाही अहवाल स्वतंत्रपणे बनविला गेला आहे.या अहवालांसंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क
वृक्ष अहवाल :- सीमा हर्डीकर, ९७५७२८५८६८
प्राणी पक्षी कीटक फुलपाखरे उभयचर सरीसृप अहवाल : अविनाश भगत, ९८९२०६१८९९ प्रा. क्लारा कोरिआ, ९९३००७१०९६
वृक्ष प्राधिकरण मंजुरी व रस्त्यासंबंधी तांत्रिक बाबी : रोहित जोशी, ९८१९७६९०६९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *