ठाणे : रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाची कामे पाहून पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनावर संतापले. रस्त्याची कामे नीट करा अन्यथा कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करा असा आदेशच पालकमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिला होता मात्र पालिका प्रशासनाकडून तातडीने ४ अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र ठेकेदाराला केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. अभियंते बळीचा बकरा ठेकेदारा मोकळे अशीच चर्चा प्रशासन लोकप्रतिनिधींमध्ये सुरू असून, पालकमंत्रयाच्या आदेशाचे काय ? असाही सवाल यानिमित्त उपस्थित हेात आहे.
शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या खड्ड्यांची पाहणी केली असता कामे दर्जा राखून योग्य न झाल्याबाबत व नागरिकांची गैरसोय झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर प्रशासनाने पालिकेतील चार अभियंत्यावर निंलबनाची कारवाई केली. रस्त्याची गुणवत्ता न राखल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र ठेकेदारावर कोणतीही कारवाई न करता अधिका-यांवर कारवाई केल्याने प्रशासनातील अधिका-यांमध्ये तसेच लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी पसरली हेाती. त्यानंतर पालिकेने रस्ते मे.बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारांस नोटीस बजावण्यात आली असून रस्ते दुरूस्तीची कामे तात्काळ व गुणवत्तापूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करून कंपनीस काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या स्मार्ट कारभाराची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
संबंधित ठेकेदारास शक्तिपीठ मानपाडा ते नागलाबंदर मलप्रक्रिया केंद्र व युनी ॲपेक्स कंपनी ते शिवमंदीर गायमुख दरम्यानच्या रस्त्याचे काम करण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेला आहे. या भागातील डांबरीकरण पुर्ण न झालेल्या भागाचे (रस्त्याची डावी बाजू ) सुरज वॉटर पार्क ते एमटीएनएल कार्यालय , कॉसमॉस ज्वेल्स ते कासारवडवली सिग्नल, पानखंडा रोड ते नागलाबंदर सिग्नल व गायमुख ते भाईदरपाडा गाव , वाघबिळ चौक ते पातलीपाडा चौक ( रस्त्याची उजवी बाजू ) या भागात पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे भरुन व तात्पुरती दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीयोग्य ठेवणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. परंतु संबंधित कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी सुचना देवूनही या रस्त्याच्या सुरज वॉटर पार्क ते एमटीएनएल कार्यालय, कॉसमॉस ज्वेल्स ते कासारवडवली सिग्नल, पानखंडा रोड ते नागलाबंदर सिग्नल व तसेच गायमुख ते भाईंदरपाडा गाव, वाघबिळ चौक ते पातलीपाडा चौक या भागात काम न केल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे या सर्विसरोडचा वापर नागरिकांना करता येत नसून हायवेवर टॅफिक होत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
रस्त्याची कामे नीट करा अन्यथा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा ..
तसेच या रस्त्यावर केलेले काम काही ठिकाणी काही दिवसातच नादुरुस्त झाले आहे. यामुळे यापूर्वी केलेले काम योग्य दर्जाचे न झाल्याचे निदर्शनास आल्याने ठेकेदाराने केलेल्या व नादुरुस्त झालेल्या कामांचे देयक महापालिकेच्यावतीने अदा करण्यात येणार नसल्याचे नोटीसीमध्ये स्पष्ट केले आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या सुचनेनुसार ठराविक वेळेत, काम पुर्ण केले नसल्याने निविदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये याचा खुलासा ३ दिवसात करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहेत. तसेच सदर कामासोबतच या ३ दिवसाच्या कालावधीत कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील देखील खड्डे दुरुस्तीचे काम योग्य गुणवत्ता राखुन काम पुर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान सर्व कामे तात्काळ न केल्यास नागरिकांना गैरसोय निर्माण केल्याबाबत योग्य तो गुन्हा दाखल करून संस्थेस काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.
ठेकेदारावर मेहेरनजर का ?
महापालिकेने प्रभाग समिती स्तरावरील खड्ड्यांना जबाबदार धरून कार्यकारी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, या कारवाईत दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करायला हवी होती. या प्रकरणी ठेकेदारावर मेहेरनजर का करण्यात आली. नगर अभियंता व ठेकेदाराला कारवाईतून कसे वगळले गेले, असा सवाल भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केलाय. महापालिकेने निलंबित केलेल्या चार अभियंत्यांच्या यादीत रस्त्याशी काहीही संबंध नसलेल्या एका अभियंत्यांचा समावेश आहे. घाईघाईत कारवाई करताना महापालिकेने भलत्याच अभियंत्यावर कारवाई केली. तसेच बळीचा बकरा करण्यात आला. मात्र, ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट न करता मेहेरनजर का करण्यात आली, असा सवाल भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे.
सव्वा दोन कोटी खड्डयात !
ठाणे महापालिकेने पावसाळ्याच्या काळात शहरातील खड्डे भरण्यासाठी केवळ सव्वा दोन कोटींची तुटपुंजी तरतूद केली. मात्र, खड्डे कधी भरले गेले, याचा नागरिकांनाच नव्हे तर नगरसेवकांनाही पत्ता लागला नाही. खड्ड्याच्या पैशांवरही महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने डल्ला मारला, अशी टीकाही डुंबरे यांनी केलीय.