मेट्राेचे कल्याण ! आता एमएमआर रिजनमध्ये मेट्रोचे जाळ विस्तारणार !

मुंबई : ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रो ५ च्या मार्गाला आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर देण्यात आली. त्यामुळे आता मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये मेट्रोचे जाळ विस्तारणार आहे. लोकल व रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे चाकरमण्यांसाठी सरकारने चांगलीच खुशखबर दिलीय.

मंगळवारच्या राज्य मंत्रिमडंळाच्या बैठकीत मेट्रो-५ आणि मेट्रो- ६ या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. ठाणे आणि मुंबईतील लाखो प्रवाशांना या प्रकल्पांमुळे दिलासा मिळणार आहे. डोंबिवली कल्याण ठाणे भिवंडी आदी परिसरातून दररोज लाखो चाकरमणी उपनगरीय लोकलने प्रवास करतात. त्यामुळे चाकरमण्यांना मेट्रोचा पर्याय मिळणार आहे. वाढत्या गर्दीमुळे लोकलचा प्रवास जीवघेणा बनला आहे. त्यामुळे लोकलसेवेवरील ताणही कमी होणार आहे. मेट्रो-५ द्वारे ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांना जोडले जाणार आहे तर मेट्रो-६ प्रकल्पाने जोगेश्वरी-विक्रोळी मार्गावर होणाऱ्या कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे. मेट्रो-५ साठी ८ हजार ४१६ कोटी तर मेट्रो- ६ साठी ६ हजार ६७२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ठाण्याहून भिवंडी-कल्याणकडे जाणाऱ्या 24.1 किलोमीटरच्या मार्गासाठी मेट्रोच्या मार्गावर 17 स्थानके असतील. ठाण्याहून कापूरबावडी, बाळकूम नाका, कशेळी, काल्हेर, पुर्णा, अंजूर फाटा, धामणकर नाका, गोपाळनगर, टेमघर, रांजणोली गाव, एमआयडीसी, गोवे, कोन, दुर्गाडी, सहजानंद चौक, कल्याण स्थानक आणि कल्याण एपीएमसी स्थानके असणार आहेत.

कल्याण- तळोजा मेट्रोला लवकरच वेग
ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो ५ च्या मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील सहका-यांचे आभार मानले.मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला वेगवान वाहतुकीने जोडण्यासाठी मेट्रो हा उत्तम पर्याय असून मुंबईसह संपूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये मेट्रोचे जाळे विस्तारावे याकरता आपण प्रयत्नशील होतो असेही त्यांनी स्पष्ट केलं. मेट्रो- ५ या मार्गाला मिळालेल्या मंजुरीनंतर कल्याण तळोजा मेट्रो प्रकाल्पलादेखील वेग येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *