ठाणे, (प्रतिनिधी) : कधी मुदतपूर्व बदली, कधी सक्तीच्या रजेवर तर महिला अधिका-यांचे काही अधिका-यांकडून उद्दामपणे वागणे असा प्रकार ठाणे महाालिकेच्या प्रशासनात सुरू आहे या प्रकारामुळे महिला अधिका-याचे खच्चीकरण होत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. तसेच प्रशासनावर वचक ठेवण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोपही डुंबरे यांनी केलाय.

गटनेते डुंबरे म्हणाले की, ठाणे महापालिकेत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायम कृपादृष्टी ठेवली जाते. तर कार्यक्षम व प्रामाणिक अधिकाऱ्यांवर बदलीची कुऱ्हाड टाकली जाते. यापूर्वी कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांची मुदतीपूर्वीच बदली केली गेली. तर अतिक्रमण विभागासंदर्भात लक्षवेधी सुचनाही सत्ताधाऱ्यांनी फेटाळली. अतिक्रमण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात आहे. महिलांशी उद्दामपणे वागणाऱ्या सहायक आयुक्तावर मेहेरनजर ठेवली जात आहे. आता लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ. खुशबू टावरी यांना कारणे न दाखविता सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे. या प्रकारातून महापालिका प्रशासनाकडून महिला अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली.

महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाची संगीतखुर्ची करण्यात आली. मंत्रालयातील एका अधिकाऱ्यासाठी वैजयंती देवगीकर यांना हटविण्यात आले होते. काही काळानंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्त करण्यात आले. पुन्हा सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यातून त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. आता डॉ. खुशबू टावरी यांच्यावर दबाव टाकल्याने त्यांनी राजीनामाच दिला. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची टीका डुंबरे यांनी केली.


कोविड आपत्तीच्या काळात ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची शक्यता व्यक्त होत आहे. या भ्रष्टाचाराला महिला अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याने व भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी महिला अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातोय का, अशी शंका गटनेते डुंबरे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *