लाचखोर त्रिकूटाला 3 दिवसांची पोलीस कोठडी
कल्याण : महापालिकेच्या नाले सफाईच्या कामाच्या बिलासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी ४० हजार रुपयाची लाच घेणारे आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे, शिपाई विजय गायकवाड, आणि आरोग्य निरीक्षक संजय धात्रक यांना लाचखोरांना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
महापालिका क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नसल्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता. यानंतर नाले सफाईची बिले काढताना संबधित प्रभागातील नगरसेवकाचे आणि प्रभाग क्षेत्रात्रील घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षकाचा ना हरकत दाखल्यासह ठेकेदारांना बिले सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. यामुळे नाले सफाईची बिले काढण्यासाठी तक्रारदार ठेकेदाराने महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक धात्रक आणि ठाकरे यांच्याकडे ना हरकत दाखला देण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी ठाकरे यांना २५ हजार तर इतर दोघांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. तडजोडी अंती एकत्रित ४० हजार देण्याचे ठरले. मंगळवारी ठेकेदाराकडून अ प्रभाग क्षेत्र कार्यालयातच ४० हजार लाच स्वीकारण्याची जबाबदारी शिपाई गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली. गायकवाड यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले यावेळी ठाकरे आणि धात्रक यांनी कार्यालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली होती.