मुंबई : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे. तर राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे . मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे.धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावी या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांनी संमती आवश्यक असेल. एखादा विद्यार्थी काही कारणास्तव शाळेत येऊ शकत नसेल, तर ते घरूनही ऑनलाईन क्लास अटेंड करू शकतात, असंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *