कल्याण : शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होता असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला होता असं विधान केलं होतं त्यावर आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली. गीते यांनी शरद पवारांवर केलेला आरोप चुकीचा आहे. शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बैठकीनिमित्ताने रामदास आठवले हे कल्याणात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. शिवसेना नेते संजय राऊत हे चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहेत, त्यावर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. उलट सुलट आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. सजंय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहेत. खासदार, प्रवक्ते आणि शिवसेना नेते आहेत. त्यांनी असे चूकीचे आरोप करून वेळ घालवू नये, असा सल्ला आठवले यांनी राऊत यांना दिला.

शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहण्यातं त्यांचं नुकसान आहे. अडीच वर्षांचा जो फॉर्म्यूला आहे त्यावर एकमत करुन भाजपा-सेनेने एकत्र यावं आणि राज्याच्या विकासाला प्रगती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवत मुंबई आणि राज्याचा विकास करावा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला पाहिजे. ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी भाजपासोबत आलं पाहिजे, असं मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. आठवलेंचा फॉर्म्युलातिन्ही पक्षांत धुसफुस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. रोज एकमेकांवर गंभीर आरोप करणं आणि परत सत्तेत राहणं परवडणारं नाही. काँग्रेसने पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेने मुख्य प्रवाहात म्हणजेच भाजपासोबत यावं. अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री राहावं आणि अडीच वर्ष फडणवीस यांना मुख्यंमंत्री करावं. पुढच्या निवडणुका एकत्रित लढून महाराष्ट्राचं भलं करावं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!