कल्याण : वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत असणारे कोळसेवाडी पोलिस ठाणे पुन्हा एकदा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेय. नाका-बंदीत दुचाकीवर जाणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यावर पोलीस कर्मचाऱ्याने काठीने मारल्याने डोक्यावर दुखापत झाली असून त्या तरूणावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान विनाकारण मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात राहणारे निलेश कदम ,भुपेंद्र झुगरे हे दोघे काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीने कल्याण पूर्व येथून उल्हासनगर च्या दिशेने जात होते .याच दरम्यान तिसगाव नाका येथे कोलशेवाडी पोलिसांची चेकिंग सुरू होती .निलेश व भुपेंद्र जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने काठीने निलेश याच्या डोक्यात मारले. काठीचा फटका निलेश च्या डोक्याला लागल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे . दरम्यान याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यास गेलो असता पोलिसांनी नोंद करून घेतली नाही. तुमच्या उपचाराचा खर्च करतो विषय वाढवू नका असे पोलिसांनी सांगितल्याचा आरोप या तरुणांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांनी मात्र चुप्पी साधली असून मिडीयाशी बोलण्यास नकार दिलाय.