डोंबिवली : स्मार्ट सिटीचे स्वप्न रंगवणा-या कल्याण डोंबिवलीत सध्या बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. शहरातील आरक्षित भूखंडावर भूमाफियांकडून खुलेआम टोलजंग इमारती उभ्या केल्या जात आहेत. डोंबिवलीतील २१ आरक्षित भूखंड भूमाफियांनी गिळंकृत केल्याची माहिती उजेडात आली असून आणखी भूखंडावर कामे सुरू आहेत. मात्र याकडे पालिका प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असलयाचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच दावडीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणात विकासकाने थेट पालिका अधिका-यांवर आरोप केले तर आयुक्तांना २५ लाख रूपये दिल्याचाही आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या आरोपाचा प्रशासनाकडून इन्कार केला जात असून अतिरिक्त आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे. मात्र हे आरोप पुसून टाकण्यासाठी तरी पालिका प्रशासनाकडून बेकायदा बांधकामावर कारवाई होईल का ? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामाचा धुमाकूळ सुरू आहे. अवघ्या सहा- आठ महिन्यात भूमाफियांकडून आरक्षित भूखंडावर टोलेजंग इमारती उभ्या केल्या जात आहेत. मात्र याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीतील २१ आरक्षित भूखंडावर टॉवर्स टोलेजंग बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेतील अनमोल नगरी येथे एका शाळेच्या आरक्षित जागेवर टॉवर्स उभा राहत आहे मात्र प्रशासनावर इतके आरोप होऊनही त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त हेात आहे. कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत मात्र त्याचा लाभ नागरिकांना न मिळता हे भूखंड भूमाफियांकडून लाटले जात आहेत. पालिका अधिकारी व विकासक यांचे आर्थिक हितसंबध गुंतलेले असल्याने या भूखंडावर कोणतीही कारवाई होत नसल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. एखाद्या इमारतीवर पालिकेच्या पथकाकडून कारवाई झाली तर केवळ भिंतीवर हातोडा मारून कारवाई केल्याचे दाखवले जात आहे, त्यानंतर अवघ्या काही महिन्यात ही इमारत जशीच्या तशी उभी राहते असे अनेक प्रकरणे घडली आहेत या विरोधात आवाज उठविणा-या जागरूक नागरिकांना धमकावल्याचे प्रकार घडत आहेत. बेकायदा बांधकाम प्रकरणात विकासकाकडून अधिका-यांवर खुलेआम आरोप केले जात असल्याने पालिका प्रशासनाची नाचक्की होत आहे. त्यामुळे हे आरोप पुसून टाकण्यासाठी पालिकेला बेकायदा बांधकामावरील कारवाई अधिक कडक कारवाई लागणार आहे.
बिल्डरने केलेले आरोप …
काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील दावडी परिसरात असणाऱ्या ६ मजली अनधिकृत इमारतीवर केडीएमसीने कारवाई केली होती. मात्र इमारतीवर कारवाई होऊ नये यासाठी केडीएमसीच्या दोन अधिका-यांना प्रत्येकी एक लाख रूपये व केडीएमसी आयुक्तांच्या नावे २५ लाख रूपये घेतल्याचा खळबळजनक आरोप केला होता. विकास आणि अधिकारी यांची हॉटेलमध्ये झालेल्या चर्चेचा सीसीटिव्ही फुटेज विकासकाने सादर केला हेाता. त्यामुळे या आरोपाला आणखीनच बळ मिळालं. दरम्यान या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यातील दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केलय. त्यामुळे या समितीचा अहवाल काय येतो याकडे लक्ष वेधलय.
वर्षभरात ६२० बेकायदा बांधकामांवर कारवाई ...
गेल्या वर्षभरात पालिकेकडून ६२० अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्या समाज कंटकांकडून खोटे आरोप केले जात आहे. मात्र अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरणाचा प्रकार असल्याचे पालिका आयुक्त सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे. मात्र अशा दबावाला कोणतीही भीक न घालता कारवाई सुरूच राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.