ठाणे, दि.20 : मतदार यादीत आपले छायाचित्र नसेल तर तपासणी करून घ्या अन्यथा मतदार यादीतून आपले नाव वगळले जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये ज्यांचे छायाचित्र नाही अशी सुमारे २लाख ९२ हजार २३९ नावे वगळण्यात आली आहेत. यादीत नाव असलेल्या सुमारे १७ हजार ३२५ मतदारांचे छायाचित्र मिळविण्यात आले असून उर्वरित ५ लाख ८ हजार ४६२ मतदारांचे छायाचित्र जमा करण्याचे तसेच तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. अशा याद्यांची तपासणी केली जात असून मतदारांचे छायाचित्र उपलब्ध करून घेणे, दुबार किंवा समान नोंदी कमी करणेसाठी अन्य जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय करण्यात येत असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

राज्यात मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असून त्याबाबत आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील अन्य जिल्ह्यांसह ठाण्याचा आढावा घेतला. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी मोहिम स्वरूपात काम करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी ठाण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी मतदारसंघनिहाय सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. दरम्यान, या दुरदृष्यप्रणाली आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यातील १८ मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा उप निवडणूक अधिकारी अर्चना कदम, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे आदी उपस्थित होते.

निर्दोष मतदार यादी तयार करा
जिल्ह्यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर आदी महापालिका निवडणुकांसाठी मतदार याद्या हा आधार असून त्या-त्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या बैठका घ्याव्यात आणि छायाचित्र नसलेली नावे वगळून निर्दोष मतदार यादीच्या कामाला गती दयावी, असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

अन्यथा यादीतून नाव वगळले जाईल…
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये छायाचित्रांसह मतदार यादीचा निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. दि.१ नोव्हेबर २०२१ पासुन दि.१जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्कीक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेट देऊन तपासणी करणे, योग्य प्रकारे विभाग, भाग तयार करून मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ५ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे मतदारांनी मतदारयादीतील आपले नाव, छायाचित्र याबाबत ३० सप्टेंबर पूर्वी तपासणी करून घ्यावी. ज्यांची नावे आहेत, मात्र छायाचित्र नाही आणि तपासणी दरम्यान संबंधीत व्यक्ती त्या ठिकाणी वास्तव्यास नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मतदारयादीतील नावासाठी nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या
विशेष पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान नोंदणी केलेल्या मतदारांची पुरवणी यादी दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदारयादीमध्ये असल्याची खात्री nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन करावी. जर आपले नाव मतदारयादीमध्ये नसेल किंवा वगळण्यात आले असेल तर दिनांक १ नोव्हेंबर पासुन सुरु होणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये नमुना ०६ भरुन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *