ठाणे, दि. २० सप्टेंबर : पोखरण रोड क्र. १ वरील रस्त्याचे रुंदीकरण वादात सापडले आहे. या रस्त्यावरील एका बड्या कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ विकास आराखड्यातील (डीपी) ४० मीटरऐवजी चक्क ४८ मीटर रस्ता तयार केला असल्याचे आज उघडकीस आले. भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी हा धक्कादायक प्रकार महासभेसमोर पुढे आला. आता या प्रकरणी चौकशी करून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

विकास आराखड्यातील रस्ता कमी-जास्त करण्याचा आयुक्तांना अधिकार आहे का, असा प्रश्न अर्चना मणेरा यांनी विचारला होता. त्यावेळी त्यावर थेट उत्तर देण्यात शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यावेळी नगरसेविका मणेरा यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार रस्ता कमी-जास्त करण्याचे आयुक्तांना अधिकार नसल्याचे मान्य केले. त्यानंतर पोखरण रोड क्र. १ येथील एका बड्या कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ ४० ऐवजी ४८ मीटर रस्ता झाला असल्याकडे अर्चना मणेरा यांनी लक्ष वेधले. त्यावेळी सभागृहाला धक्का बसला.

तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात, महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पोखरण रस्ता क्र. १ चे ४० मीटर रुंदीकरण करण्यात आले आहे. ४० मीटरपैकी २० मीटरवर डिव्हायडर बसविण्यात येणार होता. मात्र, समतानगरकडे रस्ता जाणाऱ्या चौकात वर्षानुवर्षे प्रस्थापित असलेल्या एका बड्या उद्योगसमुहाच्या फायद्यासाठी या ठिकाणी प्रत्यक्षात ४८ मीटर रुंदीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे कॅडबरी सिग्नलहून वर्तकनगरकडे जाणारा रस्ता २० फूट, तर वर्तकनगरहून कॅडबरी सिग्नलकडे जाणारा रस्ता २८ फूट आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. संबंधित वाढीव रुंदीकरणाबाबत स्थायी समिती वा महासभेचीही मान्यता घेण्यात आली नाही. त्यामुळे बेकायदेशीर रुंदीकरण व रस्ता कोणाच्या आदेशाने झाला. जादा आठ मीटर रस्त्याचा खर्च महापालिकेने का केला, असा सवाल मणेरा यांनी केला. तसेच या प्रकरणाला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मणेरा यांनी केली. अखेर या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला सविस्तर चौकशी करण्याचा आदेश देऊन दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!