कल्याण : गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज पाच दिवसांच्या बाप्पासह गौरी गणपतीला देखील निरोप देण्यात आला. कल्याण डोंबिवली शहरातील मधोमध असलेल्या ९० फिट रोड कचोरे खंबालपाडा परिसरातील भाविकांना यंदाही रेल्वे रूळ ओलांडून बाप्पाचे विसर्जन करावे लागले. अनेक वर्षापासून इथल्या भाविकांना जीव मुठीत धरूनच बाप्पाचे विसर्जन करावे लागत आहे. मात्र ना प्रशासन, ना लोकप्रतिनिधी या समस्येचे देणे घेणे असेच दिसून येत आहे. यांना सुबुध्दी दे रे बाप्पा, असेच म्हणण्याची वेळ आलीय.
कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नाही, या भागात तलाव नसल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनासाठी नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून गणेश घाटावर जावे लागते. या भागातील ग्रामदेवतेचे मंदिर देखील खाडी किनाऱ्या लगत रुळापलीकडे आहे. विसर्जनादिवशी या ठिकाणी स्थानिक सागरदेवी सेवक मंडळ आणि पोलिसांच्या मदतीने गणेश भक्तांनी व्यवस्थितरित्या विसर्जन पार पडले. खुद्द बाप्पाला देखील आपला परतीचा प्रवास करताना रेल्वे रूळ ओलांडावे लागतय. सुदैवाने आतापर्यंत कोणताही अपघात झाला नसला तरी भविष्यात होणार नाही याची शाश्वती देता येणार नाही.
दरम्यान रेल्वे रुळांवरील हा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी या परिसरात कृत्रिम तलाव बनविण्याची तसेच याठिकाणी जाण्यासाठी पुश थ्रू बोगदा बनविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी या गेल्या पाच वर्षापासून पालिका प्रशासनाकडे कृत्रिम तलाव बांधण्यासाठी तसेच रेल्वे प्रशासनाकडे बोगदा बनविण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. ५ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर यंदाच्या वर्षी पालिकेने विसर्जनासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आहे. मात्र हि व्यवस्था अपुरी असल्याने त्याचा काहीएक उपयोग झालेला नाही. त्यामुळे यंदाही भाविकांनी खाडी किनारीच बाप्पाचे विसर्जन केले. पालिका प्रशासन हजारो कोटी रूपये खर्च करते मात्र एका गावाला पुरेल इतके कृत्रीम तलाव करू शकत नाही यासारखी शोकांतिका नाही. शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण यांचाही नागरिकांच्या या समस्येकडे कानाडोळा झाल्याचे दिसून येतय.