पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने दरेकर विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद निर्माण झालाय. राजे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं.
काय म्हणाले दरेकर ,
‘गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. ‘राष्ट्रवादी हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकेवाल्यांचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीतील नेतृत्वाकडे बघा…या पक्षात कुठल्या गरीब माणसाला आमदार, खासदार होता आलं नाही. भाजपच्या आमदारांची आणि खासदारांची यादी बघा..आमच्या पक्षात संघर्ष करणाऱ्यांना स्थान आहे,’ असं ते म्हणाले.
महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रविण दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं प्रवीण दरेकरांविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आलं.
दरेकरांचाही पलटवार …
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हल्ल्यानंतर प्रवीण दरेकर यांनीही पलटवार केला आहे. आम्हाला ही थोबाड रंगवता येते. उगाच प्रसिध्दीसाठी अतिरेकी वक्तव्य करू नका असे दरेकर म्हणाले.