आपल्या देशात व्यक्ती कितीही शिकला, सवरला तरी त्याच्या विचारांचा आवाका मंदिर, मशीदपुरताच असतो. ज्या मानसिकतेने आपल्याला हजारो वर्षे विविध व्यवस्थेचे गुलाम ठेवले त्याच व्यवस्था प्राणप्रिय वाटणे हे गुलामीचे पहिले लक्षण असते आपण अजून त्यातूनच बाहेर पडलो नाही याचे मंदिर उघडा हा टाहो सर्वात मोठे उदाहरण आहे. मंदिरात मती गोठते मात्र शाळेत ती वेगवान होते. तरीही शाळा सुरू करण्याचा कुठे आवाज न येता मंदिरांसाठी शंखनाद होतो याचा अर्थ खोलात जाऊन समजून घेण्याची गरज आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. गेल्या चार महिन्यात देशात आणि राज्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विदर्भात तर ही संख्या नगण्य असल्यासारखी आहे. युरोप आणि अमेरिकेत तिसरी लाट सुरू असतानासुद्धा तेथील शाळा बंद नाही. जगभरामध्ये शिक्षणाचा फिनलॅन्ड पॅटर्न नावाजलेला आहे. त्या फिनलॅन्ड मध्ये सुद्धा शाळा प्री-प्राइमरी पासून सुरू आहेत. देशभरातील सर्व तज्ज्ञ मंडळींनी दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे मुले तीन वर्ष मागे जाण्याची भीती व्यक्त केली आहे. जर लवकरात लवकर शाळा सुरू झाल्या नाही तर याचे दुष्परिणाम संपूर्ण पिढीवर पाहायला मिळतील. पण खेदाची बाब ही की कुठलाही राजकीय पक्ष शाळा उघडण्यास संदर्भात ब्र सुद्धा काढत नाही. मंदिरे सुरू करण्यासाठी राजकीय पक्ष राज्यभर आंदोलने करतात, मोर्चे काढतात मात्र शाळा सुरू करण्यासंदर्भात मूग गिळून बसले आहे.संविधानाने सर्वांना शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार दिला व याची जबाबदारी सरकारला दिली.
गेल्या दीड वर्षापासून राज्यातील लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. ऑनलाइन शिक्षण हा निव्वळ फार्स आहे, याची जाणीव सर्व राज्यकर्त्यांना असूनसुद्धा त्यांच्या मतांचे राजकारण शिक्षणावर नसल्यामुळे शाळा सुरू करण्यासंदर्भात त्यांची भूमिका संदिग्ध आहे. जनतेची माथी देव आणि धर्माच्या नावावर भडकविता येतात मात्र शिक्षण आणि शाळा येणार्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सारासार विवेकबुद्धी वापरण्याचे तंत्र शिकवित असते. अनेक राजकीय लोकांना जनता निर्बुद्धचं असावी असे वाटते. दर्जेदार शिक्षणामुळे येणार्या पिढीमध्ये विवेकदृष्टी जागृत झाली तर त्यांचे राजकीय स्थान अडचणीत येऊन त्यांचा दांभिकपणा उघडा पडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे राजकीय पक्षांकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची अपेक्षा आपण सोडून दिली पाहिजे.
ज्यांना ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले आहे, ज्यांना वाटते की येणार्या पिढीचे जात-पात, भाषा, धर्म याच्या नावावर डोके भडकवले जाऊ नयेत, ज्यांना वाटते की सारासार विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा समाज निर्माण व्हावा त्या सर्वांनी शाळा आणि शिक्षणाची नाव पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी ताकतीने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी फक्त निवेदने, विनंती व चर्चा करून चालणार नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल. संविधानिक मार्गाने सरकारला जाब विचारावा लागेल. सर्व सुज्ञ नागरिकांनी, पालकांनी, शिक्षकांनी, संस्था चालकांनी मुलांचे भविष्य वाचवण्याची लढाई आता लढली पाहिजे. मंदिरात कोण राहतो हा प्रश्न गाडगेबाबांनी सोडवताना पुजार्याच्या पोटाकडे बोट दाखवून शिकल्या माणसाला शहाणे करण्याचा प्रयत्न करून बघितला होता, पण त्याच गाडगेबाबांची या शहाण्या माणसांनी मंदिरे उभी करून आपल्या डोक्यात खापर भरले असल्याचे सिद्ध केले आहे. मंदिरात पुजार्याचे पोट अन् शाळेत अकलेची गोठ असते हे साधे गणित आजच्या बहुजन समाजाला कळत नसेल तर त्यांचे पुढे काय होणार हे सांगायला कुण्या ज्योतिष्याची गरज नाही. मंदिर, धर्म या व्यवस्थेवर जगणार्यांना यातला नेमका फरक उत्तम कळतो फक्त तो तुमच्या टाळक्यात शिरतोय की नाही याची ते नेहमी चाचणी घेतात आणि भयताड बहुजन त्यात हमखास नापास होतात याची शंखनादवाल्यांना खात्री आहे. बघा काही जाते काय डोक्यात? ठरवा प्राधान्य कशाला द्यायचे!
लेखक : सतिश मारूती देशमुख , ठाणे