मुंबई : खड्डेच खड्डे चोहीकडे अशी अवस्था असलेल्या मुंबई आणि पूर्व उपनगरांतील तब्बल ३५१० खड्ड्यांचे रस्ते, मार्गासह सचित्र दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका प्रशासनाला घडविले. यंदाही बाप्पाचे आगमन खड्डयातून होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनव आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीतर्फे मुंबई महापालिका प्रमुख अभियंते (रस्ते विभाग) राजन तळकर यांना घेराव घालून मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची फोटोसह भेट देण्यात आली.

मुंबई आणि पूर्व उपनगरातील अंधेरी, कांदिवली, साकीनाका आदी परिसरातील रस्त्यांवर ३,५१० खड्डे आहेत, असा दावा करताना सर्वाधिक खड्डे  हे मुंबई उपनगरात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड.अमोल मातेले यांनी दिली. गणेशोत्सव तोंडावर आल्याने खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला अनेकवेळा निवेदन दिली मात्र पालिकेकडून कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. ऐन गणेशोत्सवातही खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांतून मुंबईकरांना दिलासा न मिळाल्यास राष्ट्रवादी येत्या काळात आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला .

कोटयावधींची तरतूद तरीही रस्ते खड्डयात
‘मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात रस्ते कामासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद असतानाही शहरातील सर्वच रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. उड्डाणपूल रस्त्यांची कामेही कासवगतीने सुरू आहेत. एकीकडे इंधनदरवाढीने सर्वसामान्य मुंबईकर मेटाकुटीला आला असताना वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना तीन ते चार किमीचे अंतर पार करण्यासाठी तासनतास रखडपट्टी सहन करावी लागत आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचे अ‍ॅड. मातेले यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!