डोंबिवली : डोंबिवलीकरांच्या जिव्हाळयाचा असलेल्या कोपर पुलाचे ७ सप्टेंबरला (मंगळवारी ) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, पण ४८ तास न उलटताच याच पुलावर खड्डा पडल्याने दिवसभर हा खड्डा सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. मनसेचे आमदार राजू पाटीलही खड्डयास्थळी दाखल झाले. मात्र प्रशासनाने याची तातडीने दखल घेत हा खड्डा बुजवला असला तरी विरोधकांकडून मात्र टीकेची झोड उठवली आहे.

डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा कोपर पूल रेल्वेने धोकादायक जाहीर केल्यानंतर १५ सप्टेंबर २०१९ पासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. या़ -ना- त्या कारणाने पुलाचे काम रेंगाळत गेले. अखेर ७ सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या पुलाचे लोकार्पण करत गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुल खुला झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र लोकापर्णाला अवघे ४८ तास उलटत नाहीत, तोच या पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. पुलावर पडलेला पहिला खड्डा सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. खड्डयांमुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली असतानाच मुख्यमंत्रयानी उद्घाटन केलेल्या पुलावर खड्डा पडल्याने त्याची चर्चा सर्वत्र रंगली. पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर प्रशासनाकडून तातडीने खड्डा बुजविण्यात आला. पालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितले की, नागरिकाची गैरसोय होऊ नये यासाठी पुलाचे काम युद्धपातळीवर काम पूर्ण करत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलावर मास्टिक अस्फाल्टचा एक थर देण्याचे काम शिल्लक असून लवकरच हे काम केले जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

मग इतर खड्डे बुजविण्यात तत्परता दाखवा

कोपर पुलावर पडलेल्या खड्ड्याची मनसे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली. पुलावरील एक कोटच काम शिल्लक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र हे काम पावसाने उसंत घेतल्यानंतर करायचं होतं मात्र ते केलं नाही ,या खड्ड्याची माहिती मिळताच पालिकेने ज्या तत्परतेने हा खड्डा बुजवला तीच तत्परता शहरातील खड्डयाबाबत दाखवावी असा टोला आमदार पाटील यांनी लगावलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!