कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतील माजी सभागृह नेते आणि कामगार नेते प्रकाश पेणकर ( नाना) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या ३५-४० वर्षात शिवसैनिक ते कामगार नेता अशी त्यांनी ओळख निर्माण केली. लहान असो वा मोठा.. कार्यकर्ता असो वा राजकीय नेता अथवा प्रशासनातील अधिकारी.. सर्वचजण त्यांना नाना म्हणूनच संबोधित असत. नानांची एक्झिट चटका लावणारी ठरली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सभापती, परिवहन सभापती, सभागृह नेते अशी विविध पदे त्यांनी भूषवली कल्याणातील शिवसेनेच्या पहिल्या फळीतील शिवसैनिक होते. शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव अथवा विविध आंदोलन त्यात नानांचा हिरीरीने सहभाग असायचा. त्यातूनच त्यांच नेतृत्व उभं राहिलं. कल्याणातील रिक्षा चालकांचे नेतृत्व करीत असतानाच नाना नगरसेवक बनले आणि त्यानंतर त्यांच्या यशाची कमान वाढतच गेली. रिक्षा, टॅक्सी महासंघाच्या कोकण रिजनची जबाबदारी ते सांभाळीत होते. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांच्या समस्या, अडीअडचणी शासनदरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असत. त्यामुळे नाना हे रिक्षा, टॅक्सी चालकांचेही आधारस्तंभ बनले होते. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या सरचिटणीसपदावर काम करीत होते. महापालिकेतील साडेसहा हजार कर्मचा-यांना सातवा वेतन आयेाग मंजूर करून घेण्यासाठी संघटनेचे सरचिटणीस प्रकाश पेणकर व उपाध्यक्ष रवी पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे कामगार वर्गातून त्यांचे जल्लाेषात स्वागत करण्यात आले होते. नानांच्या निधनाने कामगार, राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे
….आणि परिवहन बस सेवा सुरू केली
कल्याण डोंबिवली महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९९५ साली झाली. त्यानंतर १९९७ साली नानांची परिवहन समितीवर सदस्य म्हणून वर्णी लागली. दोन वर्षे परिवहन बसेस सुरू होऊ शकल्या नव्हत्या. १९९९ ला नाना परिवहनचे सभापती बनले. रिक्षा युनियनशी वाईटपणा केाण घेईल. रिक्षा चालकांचा नेता परिवहन सभापती बनल्याने परिवहन बसेस सुरू होणार नाही अशी चर्चा रंगली होती, मात्र नानांच्या काळातच परिवहन बस सेवा सुरू झाली ही सर्वात महत्वाची कामगिरी ठरली. रिक्षा चालकांचा नेता आणि परिवहन सभापती अशा दोन्ही भूमिका त्यांनी योग्य पध्दतीने पार पाडल्या.
कोरोना काळातही मोठं काम …
कोरोना काळातही नाना हे स्वत: पोलिसांच्या गाडीतून फिरून उद्घोषणेतून कल्याणकरांना आवाहन करीत होते. लॉकडाऊन काळातही रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली त्यांच्यासाठी मदतीचा हात दिला. नो मास्क नो रिक्षा प्रवास मास्क नसेल तर रिक्षा प्रवास करण्यास बंदी मोहिम राबविली. तसेच गोरगरीबांना अन्न वाटप केले. कोरोना काळात आणि नगरसेवक काळातही त्यांनी प्रभागात अनेक समाजोपयोगी कामे केली. कल्याण स्टेशन पश्चिम परिसरात लॉक डाऊन काळात चोर व अप्रवृत्ती करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच महात्मा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करून गस्त वाढवण्याची मागणी केली.
विरोधकही खळखळून हसत ..
एक अभ्यासू नगरसेवक म्हणूनच नानांची ओळख होती. सर्वसाधारण सभेतही ते अत्यंत मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मुद्दें मांडीत असत. विरोधकांवरही अत्यंत मार्मिक भाषेत, बोचरी टीका करीत. त्यामुळे नानांच्या टीकेने कधीच महासभेत गदारोळ झाला नाही. त्यांच्या टीकेने विरोधकही खळखळून हसत. विरोधक असो वा प्रशसन कोणावरही टीका करताना त्यांनी कधीही खालची भाषा वापरली नाही. महासभेतील वातावरण गंभीर झाल्यानंतर त्याला गमती, जमतीने हलक फुलकं करण्याचे कसबही नानांकडे हेाते.