ठाणे, दि. ८ सप्टेंबर : ठाणे महापालिकेला दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन करीत एका बिल्डरने ३१ सदनिकांची परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आल्यानंतर महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र, या गंभीर प्रकरणाबाबत आता महापालिका प्रशासन व पोलिसांची भूमिका उदासीन आहे, असा आरोप भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी आजच्या महासभेत केला. तसेच या प्रकरणावर महापालिका प्रशासनाने तत्काळ खुलासा करण्याची मागणी केली.

कोलशेत येथे विकास प्रस्वात क्र. एस०५/००५१/१२ अन्वये महापालिकेने विकासक मे. दर्शन सागर डेव्हलपर्स व वास्तुविशारद अनिल जगवानी यांच्या प्रकल्पास १४ मजली दोन इमारती उभारण्याची परवानगी दिली होती. राज्य सरकारच्या अधिसुचनेनुसार ४ हजार चौ.मी.पेक्षा अधिक भूखंड क्षेत्रावरील प्रस्तावित रहिवास विकसनाच्या बाबतीत भूखंडास अनुज्ञेय भूनिर्देशांकाच्या २० टक्के क्षेत्राच्या सदनिका भूनिर्देशांकामध्ये गणना न करता बांधाव्यात. तसेच म्हाडाने नामनिर्देशित केलेल्या खरेदीदारांना हस्तांतरीत करणे बंधनकारक आहे. या नियमानुसार या प्रकल्पात ३१ सदनिका उपलब्ध होत होत्या. या संदर्भात म्हाडाला हस्तांतरित करण्याच्या सदनिका अन्य व्यक्तींना विक्री केल्या जाणार नाहीत. त्याचबरोबर त्याचा व्यवहार करणार नाही, असे हमीपत्र संबंधित विकासकाने महापालिकेला दिले होते. प्रत्यक्षात, महापालिकेला दिलेले हमीपत्र झुगारून ३१ सदनिकांची अन्य ग्राहकांना विक्री करण्यात आल्याचा आरोप मणेरा यांनी केला आहे.
या प्रकरणी म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांनी महापालिकेकडे पत्र दिल्यानंतर, महापालिकेच्या शहर विकास विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल पाटील यांनी २९ जून २०२१ रोजी कासारवडवली पोलिस ठाण्यात विकासक मे. दर्शन सागर डेव्हलपर्स यांच्याविरोधात तक्रार नोंदविली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून तक्रार नोंदविल्यानंतरही पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. त्याचबरोबर या प्रकरणी महापालिकेकडून उदासीनता दाखविली जात आहे, असा आरोप भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी आजच्या महासभेत केला. त्याचबरोबर या प्रकरणी महापालिका प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी केली. त्यावेळी संबंधित तक्रारीबाबत पोलिसांकडून कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच वापर परवाना न घेता इमारतीच्या वापराबद्दल संबंधित विकासक, वास्तूविशारद आणि भोववटादारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकरणात वापर परवाना अदा करताना नियमानुसार दंड वसूल केला जाईल, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.

८० लाखांना सदनिका घेणारे
रहिवाशी हवालदिल, बिल्डर मोकाट

या प्रकल्पात ३१ रहिवाशांनी किमान ८० लाख ते एक कोटी रुपये देऊन सदनिकांची खरेदी केली होती. मात्र, त्यांची अजाणतेपणाने फसवणूक झाली. आता या रहिवाशांना आता भोगवटादार म्हणून जागा रिकाम्या करण्याच्या महापालिकेने नोटीसा बजाविल्या आहेत. रहिवाशांना नोटीसा बजाविण्यास तत्पर असणारे महापालिका प्रशासन बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करीत नाही. या इमारतीतील रहिवाशी हवालदिल झाले असून, बिल्डर मोकाट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!