मुंबई, दि. 4 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्यावतीने 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. या कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था आज शतायुषी होते आहे, हे समाधान काही वेगळे असून या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल काळात जिद्द आणि चिकाटीने काय करता येऊ शकते हे या संस्थेने दाखवून दिले आहे. संस्था निर्माण केल्यावर जीव ओतून इतरांना जीवदान देण्याचे काम या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केले आहे. आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही तर डॉक्टरांच्या रूपात रुग्णांचा जीव वाचवत आहे. कोविडचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होते, सुरुवातीला या संकटाची दहशत होती, मात्र आज आपण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे राज्य सरकार, प्रशासन यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र, या कौतुकाचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.

2005 च्या मुंबईतील पूरानंतर लॅप्टो, डेंग्यूचा धोका वाढला होता त्यावेळी चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात पहिली लॅब सुरु झाली, नंतर कोरोनाच्या काळात चाचण्यांसाठी सुरुवातीला कस्तुरबा आणि पुण्याची एनआयव्ही अशा दोनच प्रयोगशाळा होत्या आज या प्रयोगशाळांची संख्या सहाशेच्या वर गेल्या असून पूर्वी सात-आठ हजार खाटांची क्षमता असलेल्या या राज्यात आता साडेचार लाख खाटा वाढल्या आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तपासणीसाठी नायर रुग्णालयातच एकमेव जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इम्युनॉलॉजी, शल्यक्रिया कौशल्य आणि संगणकाधारित शिक्षण या तीन प्रयोग शाळांचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागनिर्मित पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या ‘गणेशोत्सव 2021’ या माहितीपुस्तिकेचे तसेच नायर रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱी तसेच विद्यार्थ्यांना कोविड काळात आलेल्या अनुभवांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. भारतीय टपाल विभागाने नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त जारी केलेल्या विशेष टपाल कव्हरचे प्रकाशन आणि संस्थेच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या भित्तीचित्राचेदेखील यावेळी अनावरण करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरातील विविध रुग्णालयांमध्ये कोविड काळात केलेल्या व्यवस्थापनाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही यावेळी मान्यवरांनी प्रकाशन केले. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!