शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पुजनाने झाला दिंडीस प्रारंभ

जळगाव, दि. २ : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री संत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‌‍ भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता.

        सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे 4 हजार सारस्वतांच्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते. अमळनेरकरांकडून दिंडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता.

        ग्रंथदिंडी सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई चौक, सुभाष चौक, स्टेट बॅंक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या मार्गाने येत असताना चौकात विविध ठिकाणी रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले. सकाळी 8 वाजता सुरू झालेली दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मंत्री श्री. महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. जैन, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर यांनीही या दिंडीत सहभाग घेत पायी चालले, तर मंत्री श्री. महाजन यांनी दिंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ब्रेकिंग न्यूज

error: Content is protected !!