डोंबिवली, २३ फेब्रुवारी : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या माणकोली पुलाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम फास्टट्रकवर आहे. लवकरच हे काम पूर्ण होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल अशी माहिती स्थायी समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी पत्रकारांना दिली. या पुलाबाबतची पाहणी आणि इतर माहिती देण्यासाठी पत्रकारांसमवेत पाहणीदौरा म्हात्रे यांनी केला होता.
म्हात्रे म्हणाले, कल्याण-डोंबिवलीवरून ठाणे पर्यतचा प्रवास वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रासदायक ठरतो. आता मात्र डोंबिवली ते माणकोली उड्डाणपुलामुळे नागरिकांचा त्रास दूर होणार आहे. नुकतेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर श्रीनिवास यांनीही याप्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे दरम्यान वाहतुकीच्या वेळेत बचत होणार आहे. या रस्त्यामुळे मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि पनवेल या क्षेत्रात प्रवेश न करता प्रास्तावित कल्याण रिंग रोड आणि कटाईनाकावरून राष्ट्रीय महामार्ग क्र.१६० आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.८ वरून खोपोली मार्गे वाहतूक वळेल. ज्यामुळे डोंबिवली ते ठाणे या रस्त्याने प्रवासाचा वेळ कमो होईल. डोंबिवलीकरांना ठाणे, मुंबई आता काही मिनीटाचाच गाठता येईल. या शिवाय आणखी देसाई-ऐरोली (टनेल) या नवीव रस्त्यामुळे नवी मुंबई, पनवेलही डोंबिवलीकरांना जवळ येणार आहे. हे सरकार विकास कामाला महत्व देत असल्याने कामे तात्काळ पूर्ण होत आहेत. रिंगरूट तिसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.