मुंबई : पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स, अँटीइन्फेक्शन अशा अत्यावश्यक ८०० औषधांच्या किंमती येत्या १ एप्रिलपासून वाढणार असल्यामुळे जनसामान्यांच्या महागाईच्या झळा अधिकच तीव्र होणार आहेत. यातील बहुसंख्य औषधांचा लोक नियमित वापर करतात. त्यामुळे या औषधांच्या किंमती सरकारच्या नियंत्रणात असतात. या कंपन्या औषधांच्या किंमती वर्षाला कमाल १० टक्केपर्यंत वाढवू शकतात.
यात पॅरासिटेमॉल, ॲनिमियावरची औषधे, जीवनसत्त्वे व खनिजे आदी औषधांचा समावेश आहे. करोना रुग्णांवर उपचारांसाठी लागणारी काही औषधे व स्टिरॉइड्सदेखील या वर्गांत समाविष्ट आहेत. औषधांत वापरायच्या पदार्थांच्या किंमतींमध्ये गेल्या काही वर्षांत १५ ते १३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय पॅरासिटेमॉल १३० टक्के, एक्सिपियंट्स १८ ते २६२ टक्के, ग्लिसरीन व प्रोपीलीन ग्लायकॉलसह सॉल्व्हंट्स २६३ टक्के, सिरप्स ८३ टक्के, इंटरमिडिएट्स ११ ते १७५ टक्के, पेनिसिलीन १७५ टक्के अशी प्रचंड वाढ विविध पदार्थांच्या किंमतींमध्ये झाली आहे. सहाजिकच गेल्या काही दिवसांपासून औषध कंपन्यांकडून दरवाढीची सातत्याने मागणी होत होती. यापूर्वी २०२२ मध्ये औषधांच्या किंमतींमध्ये १२ टक्के आणि १० टक्क्यांनी वाढ झाली होती.