डोंबिवली : येथील स. है. जोंधळे विद्यामंदिर शाळेतील इंग्रजी माध्यमातील इयत्ता ५ वी अ- ब च्या इयत्तेत शिकणा-या एकूण ८० विद्यार्थ्यांना शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना गणिते येत नसल्याच्या कारणावरून नीलम भारमल या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना रॉडने आणि काठीने मारल्याची तक्रार पालकांनी केली आहे. पालकांना दाद न दिल्याने मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकत्यांनी पालकांसह थेट शाळेत जाऊन शाळा प्रशासनाला जाब विचारला.

नीलम भारमल या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना रॉडने आणि काठीने मारल्याने त्रूांच्या पाठीवर अंगावर व्रण उठले होते. त्यामुळे संतप्त पालकांनी गुरूवारी शाळेत येऊन मुख्याध्यापक यांना याविषयी विचारणा केली. मात्र मुख्याध्यापकांकडून रितसर उत्तर न मिळाल्याने पालकांनी शाळेच्या विरोधात उठाव केला. यावेळी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत येऊन जाब विचारला. संबंधित शिक्षिकेवर विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना (उबाठा) व मनसे यांनी केली.

याबाबत बालमणी मेनन यांनी दिलेल्या माहितीनुसार नीलम भारमल या काही दिवसांपूर्वीच शाळेत दाखल झाल्या आहेत. त्यांची केवळ मुलाखत घेतल्यानंतर त्या वर्गावर गेल्या होत्या त्या दिवशी नक्की काय झाले असे त्या शिक्षिकेला विचारले पण त्यांनी काहीच सांगितले नाही. पालकांनी याबाबत माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे समजते.

शिवसेना (उबाठा) चे स्थानिक नेते तात्यासाहेब माने शाळेच्या मुख्याध्यापकांना चांगलेच खडसावले. पालक आपल्या मुलाला शिक्षणासाठी शाळेत पाठवतात पण शिक्षक अशी गुरांसारखी मारहाण कशी करतात. तुमच्याकडे त्या शिक्षिकेची माहिती असेल तर द्या, आम्ही त्या मॅडमना धडा शिकवतो. लहान मुलांना पाठीवर, हातावर वळ उठले आहेत, शिकविण्याची ही कोणती पद्धत ? असा संतप्त सवाल केला. मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे म्हणाले, शाळा प्रशासनाने त्या शिक्षिकेला पाठीशी घातलं तर मनसे स्टाईलने याचा समाचार घेऊ असा इशारा दिला.

पालक आणि कार्यकर्ते संतापल्याने वातावरण चांगलेच गंभीर बनले होते. अखेर विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पालकांची समजूत काढीत वातावरण शांत केले. शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालक यांची एकत्रीत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असे खंदारे यांनी संतप्त पालक आणि कार्यकत्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देत वातावरण शांत झाले. याप्रकरणी चौकशी करून संबधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे खंदारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *