जगातील ७ आश्चर्यांचे मुंबईत दर्शन घडणार

मुंबई : जगातील ७ आश्चर्यांचे मुंबईत दर्शन घडणार आहे, हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्यच वाटलं असेल, हो पण हे खरं आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने दक्षिण मुंबईतील भंडारवाडा टेकडीवरील जोसेफ बाप्टीस्टा उद्यानात जगातील ७ आश्चर्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. त्यामुळे जगातील ७ आश्चर्यांना जवळून पाहिल्याचा आनंद सर्वांनाच घेता येणार आहे.

माझगांव परिसरात डॉकयार्ड रेल्वे स्टेशनच्या जवळ महापालिकेचे ‘जोसेफ बाप्टीस्टा उद्यान’ आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे १०० फूटांपेक्षा अधिक उंच असणा-या टेकडीच्या माथ्यावर असणारे हे उद्यान सुमारे ५ लाख ४४ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक असणा-या या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रजातींची फळझाडे, फूलझाडे, वेली आहेत. उद्यानातून दिसणा-या दक्षिण मुंबईच्या विहंगम दृश्यासह इथे असणारा छोटा कृत्रिम धबधबा देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा ठरलाय. मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या उद्यानांपैकी असणारे दक्षिण मुंबईतील ‘जोसेफ बाप्टीस्टा उद्यान’ हे अभ्यासू विद्यार्थ्यांचे एक आवडीचे ठिकाण म्हणूनच ओळखले जाते. या उद्यानातून दिसणारे दक्षिण मुंबईचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक देखील या उद्यानाला भेट देत असतात. जगातील ७ आश्चर्याचे उद्यान उभारण्याची संकल्पना माजी नगरसेविका यामिनीजाधव या़ंची असून, सभागृह नेते यशवंत जाधव यांच्या प्रयत्नातून हि संकल्पना साकारली जात आहे. ७ आश्चर्यांच्या प्रतिकृतींच्या जवळ संबंधित मूळ ठिकाणाची माहिती व वैशिष्ट्ये सांगणारे फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच प्रतिकृतींच्या सभोवताली रंग बदलणारे एल.ई.डी. प्रकारातील दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. या सर्व कामांसाठी साधारणपणे २ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कार्यादेश मिळाल्यानंतर साधारण ६ महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे त्यादृष्टीने प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार हे काम साधारणपणे मे २०१८ पर्यंत होण्याचा अंदाज पालिकेकडून वर्तविण्यात आलाय.

कोणती ७ आश्चर्य
ब्राझिल देशातील रिओ शहरातील येशू ख्रिस्तांचा पुतळा , इटली मधील पिसा शहरातील कलता मनोरा, अमरिकेतील न्यूयॉर्क शहरातील स्वातंत्र्य देवतेचे पुतळा, इटलीतील रोम शहरातील कलोसियम या खुल्या सभागृहाचा समावेश आहे. याचबरोबर फ्रान्स मधील पॅरीस शहरातील आयफेल टॉवर, पुरातन संस्कृतीशी नाते सांगणारा मेक्सिको देशातल्या टिनम शहरातील चिनचेन इत्झा पिरॅमिड आणि आपल्या भारतातील आग्रा शहरातील ताजमहाल या ७ आश्चर्यांच्या प्रतिकृतींचा समावेश आहे.
——–

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *