ठाणे, दि.९ : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त शेतकरी बांधवांना डिजीटल स्वाक्षरीकृत गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्याची प्रत मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५ लाख २४ हजार ४९१ खातेदारांना शेतीचा सातबारा मोफत घरपोच देण्याची मोहिम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
दि. २ ऑक्टोबरपासून ही मोहिम जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून आतापर्यंत ठाणे तालुक्यात ७००, कल्याण २०००, मुरबाड १८००, अंबरनाथ १७००, मिरा भाईंदर ४००, शहापूर १२००, भिवंडी १७०० असे सातही तालुक्यात एकूण ९५०० इतके सातबारा वितरीत करण्यात आले आहेत. या महिनाअखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मोफत सातबाऱ्याचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी क्षेत्रिय प्रशासनाला दिले आहेत.
ठाणे जिल्हयामध्ये एकूण ६ लाख ४५ हजार १७१ इतके सातबारे असून त्यापैकी ५ लाख ४ हजार ९१ शेतीचे सातबारा आहेत. डिजिटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमी अंतर्गत विकसीत करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक शेतजमिनीचा सातबारा अद्ययावत उताऱ्याच्या प्रती गावामध्ये संबंधीत तलाठ्यामार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांना मोफत सातबारा घरपोच वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदारांना नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून तलाठ्यांमार्फत सातबारा वाटपास सुरूवात झाली आहे, असे महसुल शाखेचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
शेतकरी बांधवांनी या मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटप मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. वाटप केलेल्या सातबारा मध्ये काही त्रुटी किंवा विसंगती असल्यास खातेदाराचा अभिप्राय घेऊन त्याची पूर्तता केली जाईल. जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.