गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पटीने मंदिर समितीचे उत्पन्न वाढले आहे. तर अवघ्या दोन वर्षांत सात किलो सोन्याचे व ६५ किलो चांदीच्या दागिन्यांची खजिन्यात भर पडली आहे.
सोलापूर , 18 फेब्रुवारी : कष्टकरी शेतकरी आणि सर्वसामान्य गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरीच्या सावळ्या विठुरायाची श्रीमंती वाढू लागली आहे. कोरोनानंतर विठुरायाच्या खजिन्यात तब्बल ६१ कोटींचे दान जमा झाले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पटीने मंदिर समितीचे उत्पन्न वाढले आहे. तर अवघ्या दोन वर्षांत सात किलो सोन्याचे व ६५ किलो चांदीच्या दागिन्यांची खजिन्यात भर पडली आहे. दक्षिण भारताची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरीच्या विठुरायाची महती सातासमुद्रापार गेली आहे.
देशासह परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे मंदिर समितीला मिळणाऱ्या देणगीच्या रकमेत ही भरीव वाढ झाली आहे.
अलिकडेच नांदेड येथील एका भाविकाने पावणेदोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने विठुरायाला गुप्तदान म्हणून अर्पण केले आहेत. मंदिर व्यवस्थापनाच्या प्रयत्नामुळे देणगीदारांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना काळात मंदिर भाविकांना दर्शनासाठी वर्षभर बंद होते. तरीही देखील भाविकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून विठुरायाला १२ कोटींचे दान दिले होते.