अनधिकृत सिलिंडर्सवर बीएमसीची धडक कारवाई : ५५ सिलिंडर्स केले जप्त
मुंबई : महापालिकेच्या ‘ई’ विभागात नुकत्याच करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान ५५ अनधिकृत सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी ४८ सिलिंडर्स हे विविध उपहारगृहांमधून जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये डंकन रोडवरील तवा हॉटेल; टँक पाखाडी परिसरातील सुभान कॅटरर्स, सुरती मोहल्ला परिसरातील नागोरी मिल्क सेंटर यासारख्या आस्थापनांचा समावेश आहे. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात देखील धडक कारवाई करण्यात आली असून, या कारवाई दरम्यान ७ सिलिंडर्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती ‘ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी दिली.
पालिकेचे उपायुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्या आली. यावेळी मौलाना आजाद मार्ग, मदनपुरा, आनंदराव नायर मार्ग, नागपाडा, सुरती मोहल्ला, नारियल वाडी, टँक पाखाडी, डंकन रोड, दारुखाना मार्ग आणि रे रोड स्टेशनच्या परिसरातील उपहारगृहातील सिलिंडर्सच्या साठ्याची पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान परवानगीपेक्षा अधिक आढळून आलेले ४८ सिलिंडर्स जप्त करण्यात आले . तसेच ना. म. जोशी मार्ग, साखळी स्ट्रीट, महाराणा प्रताप चौक (माझगाव सर्कल) इत्यादी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर / खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर देखील धडक कारवाई करण्यात आली. या दरम्यान खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या साहित्यासह ७ सिलिंडर्स देखील जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वी ‘इ’ विभाग परिसरात दि. २१ व २२ डिसेंबर २०१७ करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ३४ अनधिकृत सिलिंडर्स; तर दि. २० डिसेंबर २०१७ रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान २८ सिलेंडर्स जप्त करण्यात आले होते. तसेच दि. २१ व २२ डिसेंबर रोजी ३० अनधिकृत बांधकामांवर देखील कारवाई करण्यात आली होती. तर दि. २० डिसेंबर रोजीच्या कारवाई दरम्यान २९ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली होती, अशीही माहिती गायकवाड यांनी दिली .