ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना कोविड १९ चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणा-या ठाणे महानगरपालिकेने गुरूवारी एका दिवसात तब्बल ५०५२ इतक्या चाचण्या केल्या. दरम्यान चाचण्यांची संख्या वाढत असतानाही दुस-या बाजूला कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात महापालिका प्रशासनाने यशस्वी ठरले आहे.
कोरोना कोविड १९ चाचण्याची संख्या वाढविण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच सर्वांना निर्देश दिले होते. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सातत्याने चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर महापौर नरेश गणपत म्हस्केही याचा पाठपुरावा करीत आहेत.त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी यासंदर्भात कठोर प्रयत्न करून चाचण्यांची संख्या वाढविण्यात यश मिळविले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरूवातीस तीन हजारांपेक्षा जास्त आणि त्यानंतर रोज चार हजार चाचण्या करण्याचे उदिष्ट त्यांनी निश्चित केले होते.
याबाबत महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीमध्ये ॲंटीजन टेस्टींग सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक प्रभागमध्ये टेस्टींग सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही सार्वजनिक ठिकाणीही ॲंटीजन टेस्टींग सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. ॲंटीजन चाचण्यांबरोबर महापालिका आयुक्तांनी आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये महापालिका तसेच खासगी प्राधिकृत प्रयोगशाळांच्या माध्यमातून सातत्याने चार हजारपेक्षा जास्त कोरोना कोविड १९ चाचण्या करण्याचे उदिष्ट महापालिकेने साध्य केले आहे. दरम्यान ३ सप्टेंबर, २०२० रोजी ठाणे शहरामध्ये सर्वाधिक एकूण ५०५२ कोरोना कोविड १९ चाचण्यांचे उदिष्ट पूर्ण केले आहे. त्याचबरोबर दुस-या बाजूला रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्यातही प्रशासनाने यश मिळविले आहे.
आम्ही गाफिल नाही, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही – डाॅ. विपिन शर्मा
ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून आम्ही चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आम्ही रोज चार हजारांच्यापुढे चाचण्या करीत आहोत. काल ५ हजार चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. गेल्या आठवड्यात काही प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे ही वस्तुस्थिती आहे. पण गणेशोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले होते त्याचबरोबर आम्ही चाचण्यांची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे थोडीफार रूग्णसंख्या वाढली आहे. पण त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. महापालिका प्रशासन याबाबत सतर्क असून कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास महापालिका सक्षम आहे असे आयुक्तांनी सांगितले.
माॅल्स व ठाणे स्टेशनवर ॲंटीजन चाचणी सेंटर्स
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ठाणे शहरामधील माॅल्स सुरू करण्यात आले आहेत. माॅल्समधील नागरिकांची गर्दी लक्षात घेवून माल्समध्ये प्रवेश करणा-या प्रत्येकाची ॲंटीजन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर परप्रातांतून परत येणा-या मजूरांची संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्तांनी ठाणे स्टेशन येथे टेस्टींग सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे स्टेशनवर चार पथकांच्या माध्यमातून चाचण्या करण्याचे काम सुरू आहे.
———-