मुंबई, दि.४ एप्रिल– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत कक्षाकडून ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 10 कोटी 27 लाख, आणि मार्च 2023 मध्ये विक्रमी 11 कोटी 95 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो असे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.