चेन्नई, 04 डिसेंबर : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे मिचॉन्ग चक्रीवादळ मंगळवारी किनारपट्टीला धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे विविध कारणांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय.
हवामान खात्याने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, मिचॉन्ग चक्रीवादळाची तीव्रता मंगळवारी 5 डिसेंबर रोजी आणखी वाढेल. तसेच हे वादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा देखील आयएमडीकडून देण्यात आलाय.
चेन्नईच्या बहुतांश भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. येथील सखल भागात मोठा पूर आलाय. चेन्नईत रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. तसेच मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तसेच पावसामुळे चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या 6 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रेन रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्व प्रवाशांना संपूर्ण परतावा मिळणार असल्याचे दक्षिण रेल्वेने जाहीर केले आहे.
चेन्नई विमानतळावरील धावपट्टीवर देखील पाणी तुंबल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंगळूरच्या दिशेने वळवण्यात आली. दरम्यान चेन्नई विमानतळावरील धावपट्टी ही मंगळवार 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.