ठाणे : अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ४३ कोटींचा भरघोस निधी प्राप्त झाल्यानंतर आता शिळफाट्यालगत देसाई गाव येथील खिडकाळी शिव मंदिर आणि परिसराचे सुशोभिकरणासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खिडकाळी येथील शिवमंदिराचा तीर्थ क्षेत्राच्या धर्तीवर विकास होणार असून शिवमंदिर परिसराचे रूप पालटणार आहे अशी माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात स्वयंभू शिवलिंग असलेल्या शिवमंदिरांमध्ये अंबरनाथचे शिवमंदिर आणि देसाई गावाजवळील खिडकाळी शिवमंदिराचा उल्लेख सापडतो. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ४३ कोटी रूपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात त्यांना यश आले. त्यामुळे लवकरच पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आणि देशातील अग्रगण्य आरेखकांच्या मदतीने शिवमंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे.

अंबरनाथमधील शिवमंदिरानंतर खिडकाळी येथील प्राचीन शिवमंदिराची ओळख आहे. खिडकाळी येथील हे शिवलिंग स्वयंभू आहे. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी येत असतात. तसेच महाशिवरात्री उत्सवाच्या दरम्यान काशी, अयोध्या, उत्तराखंड येथून साधू संत येते वास्तव्यास येतात. स्वामी शिवानंद महाराज यांनी १९३४ मध्ये येथे समाधी घेतली असून खिडकाळी मंदिर हे भाविकांसाठी तीर्थस्थान आहे. तसेच खिडकाळी मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी सदर ट्रस्टमार्फत मागणी देखील केली आहे. खिडकाळी येथील शिवमंदिरास तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती.

शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन संबंधी विविध योजनांमार्फत या मंदीराचा तसेच आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल आणि भविष्यात एक उत्तम तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल त्यामुळे यासाठी भरघोस निधी मिळावी यासाठी नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निधी देण्याची मागणी केली होती. या मागणीला अखेर यश आले असून नगरविकास विभागातर्फे खिडकाळी शिवमंदिराच्या आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे खिडकाळी येथील शिवमंदिर आणि परिसराचे रूप पालटणार आहे असे खासदार डॉ शिंदे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!