सर्व यंत्रणांनी वेळेत निधी खर्च करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

ठाणे, ता. ११  : ठाणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०२३-२४ च्या एकूण ४७८.६३ कोटीचा  प्रारुप आराखड्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सर्व यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी देसाई यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक  देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, आमदार सर्वश्री किसन कथोरे, राजू पाटील, गणपत गायकवाड, कुमार अयलानी, रईस शेख, निरंजन डावखरे, संजय केळकर, रमेश पाटील, डॉ. बालाजी किणीकर, शांताराम मोरे, महेश चौघुले, दौलत दरोडा,  गीता जैन आदी उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

यावेळी सन २०२२-२३ या वर्षाच्या जिल्हा नियोजन निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. सन २०२२-२३ या वर्षात जिल्ह्याला ६१८ कोटींचा  मंजूर करण्यात आला होता. त्यातील प्राप्त निधीपैकी ४८ टक्के निधी खर्च झाला आहे. मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यास राज्य शासनाने सन २०२३-२४ साठी ४७८ कोटी ६३ लाखांचा नियतव्य कळविला होता. त्यानुसार आजच्या बैठकीत या नियतव्ययास मंजुरी देण्यात आली. राज्यस्तरीय बैठकीत हा निधी वाढवून ९०२ कोटी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. 

जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेकरिता सन २०२३-२४ साठी शासनाने एकूण ७३.४४ कोटी  नियतव्यय कळविला आहे. त्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली. आदिवासी उपयोजनेसाठी सन २०२२-२३ या वर्षात प्राप्त निधी पैकी 39.09% खर्च झालेला आहे. अनुसुचित जाती उपाययोजना (विशेष घटक योजना) सन 2023-24 करिता शासनाने एकूण 72.00 कोटी नियतव्यय कळविला आहे. सन 2022-23 या वर्षाचा प्राप्त निधी 25.20 कोटी रुपये (35%) निधी प्राप्त असून 2.29 कोटी रु. चे प्रस्ताव प्रशासकिय मान्यतेस्तव सादर करण्यात आलेले आहेत. 

*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील सूचनांची अमंलबजावणी करावी – पालकमंत्री*

यावेळी पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. देसाई म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा विनियोग करताना लोकप्रतिनिधींकडून कामांची यादी घ्यावी व त्यांनी सुचविलेली कामे प्रस्तावित करावीत. सर्व यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल, याकडे लक्ष द्यावे. ज्याचा निधी खर्च होणार नाही, त्यांच्यावर विभागीय चौकशीची कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी यंत्रणांनी काटेकोरपणे करावी. राज्यस्तरीय प्रश्नांवर मंत्रालयात बैठक घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

*जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी व आदर्श शाळा उपक्रम राबविणार*

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे चांगली रहावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शाळा व आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 14 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 103 शाळांची निवड या योजनेसाठी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिली. 

गेल्या नऊ वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीचा एकूण 99 टक्केहून अधिक निधी खर्च होत असून यावर्षीही शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी यावेळी सांगितले.

*जिल्हा सांख्यिकी पुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन*

यावेळी ठाणे जिल्ह्याचे श्री. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार किसन कथोरे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. त्याला डॉ. बालाजी किणीकर यांनी अनुमोदन दिले. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अन्न व पोषण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कडधान्याचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या सांख्यिकी माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. कृषी विभागाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना व प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती देणाऱ्या चित्ररथास पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी प्रास्ताविकात जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!