मुंबई – देश चालवण्यासाठी ३०० जागा पुरेशा असतात. ४०० जागा संविधान बदलण्यासाठीच लागतात, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. संधी मिळाली तर आम्ही संविधान बदलू अशी शपथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं १९५० मध्येच घेतली असल्याचंही ते म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा, त्यांच्याकडून देण्यात आलेली ४ जागांची ऑफर, भाजपची ४०० पारची घोषणा यावर सविस्तर भाष्य केलं.
२०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या बाजूनं वातावरण होतं. युफोरिया होता. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच त्यांना नेत्यांची पळवापळवी करावी लागतेय, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी भाजपचा समाचार घेतला. संविधान बदलण्यासाठीच ४०० जागा गरजेच्या असतात. सरकार चालवण्यासाठी ३०० जागादेखील पुरेशा असतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.