मोहाली, 28 ऑक्टोबर: पंजाबमध्ये पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मोठ्या मॉड्यूलचा भंडाफोड केलाय. याप्रकरणी आज, शनिवारी बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त केला आहे. या दहशतवाद्यांचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी जोडले आहे.
मोहालीत बब्बर खालसा इंटरनॅशनलचे काही दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना गुप्तचरांकडून मिळाली होती. पोलिसांनी तपास केला असता येथे 4 दहशतवादी लपून बसल्याचे कळले. पोलिसांनी तात्काळ अटक मोहीम सुरू करून चारही दहशतवाद्यांना अटक केली. दहशतवाद्यांकडून काही संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आली आहेत. त्यांना टार्गेट किलिंगसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या हरविंदर रिंडा या दहशतवादीच्या थेट संपर्कात असून तो त्यांना पूर्ण मदत करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आयएसआयच्या मदतीने हरविंदर रिंडा त्यांना शस्त्रे आणि आर्थिक मदत पाठवत होता. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून 6 पिस्तुले आणि 275 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ड्रोनच्या मदतीने पाकिस्तानकडून त्यांना शस्त्रे आणि आर्थिक मदत पाठवण्यात आली होती.पंजाब पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून या कारवाईला दुजोरा देणाऱ्या 2 पोस्ट केल्या आहेत. पंजाब पोलिसांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.