नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारनं दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. यानंतर त्यांना मिळणारा डीए आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के झाला आहे. दरम्यान, मोदी सरकानं केंद्रीय कर्मचारी आणि पेशन्सधारकांना फायदा होणार असून त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जोरदार वाढ होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा फायदा १ जुलै २०२३ पासून उपलब्ध होईल. महागाई भत्ता वाढल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. वर्ष २०२३ साठी, सरकारनं पहिली दुरुस्ती केली होती आणि २४ मार्च २०२३ रोजी डीए वाढवण्याची घोषणा केली होती, तेव्हा ३८ टक्के डीए ४ टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के करण्यात आला होता. यानंतर १ जानेवारी २०२३ पासून या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार असल्याची घोषणा केली होती. १५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. २४ ऑक्टोबरला दसरा आहे. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी आहे. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काळात अन्नधान्य महागाईत मोठी वाढ झाली आहे. किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांवर आला आहे, जो ऑगस्टमध्ये ६.८३ टक्के होता. यापूर्वी जुलै २०२३ मध्ये किरकोळ महागाई दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला होता. अन्नधान्य महागाईचा दर सप्टेंबरमध्ये ६.५६ टक्क्यांवर आला, जो ऑगस्टमध्ये ९.९४ टक्के होता. मात्र गहू, तांदूळ, अरहर डाळ आणि साखरेच्या दराने सर्वसामान्यांना हैराण केले असून, त्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे दिलासा मिळणे अपेक्षित आहे.