मुंबई : मुंबईतील सर्वात उंच असलेल्या वन अविघ्न पार्क या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आज भीषण आग लागली. वा-यामुळे ही आग २० व्या मजल्यापर्यंत पोहचली मात्र आगीपासून जीव वाचिवण्याचा प्रयत्न करणारा अरूण तिवारी या तरूणाचा खाली पडून मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या वर्षभरात साडेतीन हजार आगीच्या घटना घडल्या असून त्यात शंभरजणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे आगीच्या घटना थांबणार तरी कधी ? असा सवाल मुंबईकरांमध्ये व्यक्त होत आहे.
करीरोड येथील महादेव पालव मार्गावर वन अविघ्न पार्क ही तळमजला अधिक ६० अशी बहुमजली इमारत आहे. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आज दुपारी ११.४५ वाजता आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलासह सर्व संबंधीत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे स्वरुप वाढल्याने इतर ठिकाणांहून देखील अग्निशमन यंत्रणा पाचारण करण्यात आली. सुमारे १४ फायर इंजिन, ९ जम्बो टँकर, १ नियंत्रण कक्ष वाहन, ९० मीटर उंचीची १ आणि ५५ मीटर उंचीची १ अशा २ शिडी (स्कायलिफ्ट) आदी मिळून सुमारे ४० वाहने घटनास्थळी तैनात होती. या यंत्रणेसह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्नांची शर्थ करुन दुपारी साडेतीन वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. तर संध्याकाळी ४ वाजून ५८ मिनीटांनी आग पूर्णपणे शमली. या दरम्यान अग्निशमन दलाने इमारतीतून १६ नागरिकांची सुखरुप सुटका केली. तत्पूर्वी, जीव वाचविण्याच्या प्रयत्नात १९ व्या मजल्यावरुन खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अरूण तिवारी या एका व्यक्तिचा दुर्दैवाने मृत्यू ओढवला आहे.
दोषींवर कारवाई करणार : महापौर
दरम्यान इमारतीतील रहिवाशांनी विकासकासंदर्भात तक्रार केली आहे. सोसायटी रहिवाशांकडे हस्तांतरीत न केल्यामुळे अनेक कामे प्रलंबित असून यामुळे ही आगीची घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या तक्रारीबाबत योग्य ती चौकशी करून प्रशासनाने आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
आगीची सखोल चौकशी : आयुक्त
आगीच्या घटनेची संपूर्ण प्रशासकीय चौकशी करण्यात येईल. तसेच तक्रारीची पडताळणी करुन त्यात तथ्य आढळले तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.