घोटाळ्याची चौकशी करा अन्यथा आंदोलन – मुंबई कॉंग्रेसचा इशारा !
मुंबई – महापालिका शाळांतील लाखों विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय वस्तूंच्या पुरवठ्यात मोठा घोटाळा झाला आहे. साधारण ३३० कोटी रूपयांचा हा घोटाळा असल्याचा आरोप माजी उपमहापौर अश्रफ आझमी, माजी नगरसेवक मोहसिन हैदर, सुफियॉं वणू यांनी केला आहे. अद्यापही मुलांना शालेय साहित्य मिळालेलं नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही मुंबई कॉंग्रेसमधील पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या घोटाळ्याबाबत अधिक माहिती देताना अश्रफ आझमी म्हणाले की, शाळा सुरू होते तेव्हा शैक्षणिक साहित्यासह गणवेश, बूट, रेनकोट अशा २७ वस्तू प्रत्येक विद्यार्थ्याला दिल्या जातात. यासाठी ३३० कोटी रूपयांची निविदा मध्यवर्ती खरेदी विभागाकडून (सीपीडी) काढण्यात आली. या निविदा एसआरएम प्रणालीवरून काढल्या जातात. यासाठी कंत्राटदारांशी चर्चा (प्रीबीड) झाली.
मधल्या काळात २५ लाखांवरील कंत्राटं महापालिका महाटेंडर द्वारे भरेल असं पत्रक निघालं. मग ही प्रक्रिया थंडावली.
विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये यासाठी मंबई कॉंग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आणि माजी नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला अनेक पत्रं लिहिली. टेंडर प्रक्रियेत उशीर होत असेल तर या वस्तूंची रक्कम विद्यार्थ्यांच्या / पालकांच्या खात्यात जमा करावी, ते खरेदी करतील अशी मागणी मुंबई कॉंग्रेस कडून करण्यात आली. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
मात्र वर्षभरानंतर आता हेच टेंडर एसआरएम प्रणालीद्वारे कंत्राटदारांना मंजूर केलं गेलं. ही सगळी प्रक्रिया संशयास्पद आहे, अशी भीती व्यक्त करत या सगळ्याची चौकशी करावी अशी मागणी मुंबई कॉंग्रेसने केली आहे. मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य अद्याप न मिळाल्याने मुलांची गैरसोय होतेय. अनेक शाळांच्या वर्गात पावसाचं पाणी गळतंय. तर काही वर्गांत मुलांना बसायला बेंच नसल्याने जमिनीवर बसावं लागतंय, अशी माहिती अश्रफ आझमी, मोहसिन हैदर यांनी पुराव्यांसहित जाहीर दिली.
महापालिका विद्यार्थ्यांसाठी वस्तू पुरवठा निविदा घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी तातडीने करावी. हा विलंब का लागला? यातील दोषी कोण? हे कंत्राट कुणाला देण्यात आलं, हे जाहीर करावं. अन्यथा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार आंदोलन करण्याचा इशारा मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी दिला.
पत्रकार परिषदेत अश्रफ आझमी, मोहसिन हैदर, सुफियॉं वणू, मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, तसंच मुंबई कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, तुषार गायकवाड़, सुरेशचंद्र राजहंस, कचरू यादव, निझाम राईन आदी पदाधिकारी उपस्थित होते.