मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिनांक ९ एप्रिल २०२१ ते दिनांक ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील एकूण ३१ हजार ३९८ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख ५६ हजार ९१० चौरस मीटर इतके होते. विशेषतः डांबरी रस्त्यांवर पावसाळी पाण्यामुळे रस्त्यांवर खड्डे तयार होण्याची समस्या निर्माण होते, ही बाब लक्षात घेता यापुढे मोठ्या रस्त्यांसह ६ मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिका प्रशासनाने अवलंबले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असतात. रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे कार्य महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात येते. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित कोल्ड मिक्स महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो.

प्रत्येक विभागाला २ कोटीचा निधी
रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा आमंत्रित करून महानगरपालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट द्विवार्षिक स्वरुपाचे आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत.

महानगरपालिकेतर्फे दिनांक ९ एप्रिल २०२१ ते दिनांक ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. त्यात महानगरपालिकेच्या धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) मार्फत २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांना मिळून एकूण २ हजार ६९६ मेट्रिक टन (१ लाख ०७ हजार ८४३ बॅग) वितरित करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध महानगरपालिकेच्या नियमित कामगारामार्फत २२ हजार ८९७ खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. या बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ ४९ हजार ९१९ चौरस मीटर आहे. तसेच, खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत ८ हजार ५०१ खड्डे बुजविण्यात आले आहेत. या बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ १ लाख ०६ हजार ९८५ चौरस मीटर आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!